मडगाव: गोव्यातील मडगाव येथील एका गॅरेजला आग लागून अंदाजे दोन लाखांची मालमत्ता जळून खाक झाली. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गेराल्डो क्लॅमेंट यांच्या मालकीचे हे गॅरेज असून, कारचे डेन्टींगचे काम चालू असताना ऑक्सयासेटीलीन गॅसला गळती लागल्याने ही आग लागली असल्याची माहिती मडगाव अग्निशामक दलाच्या कार्यालयातून देण्यात आली.
दलाचे अधिकारी गील सोझा यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी आग विझविताना सहा लाखांची मालमत्ता आगीच्या भक्ष्यस्थानाहून पडण्यापासून बचाविली. पेडा मडगाव येथील लुसियानो इमारतीत तळमजल्यावर दुकान क्रमांक १ मध्ये हे गॅरेज आहे. तेथे कारच्या डेन्टींगचे काम चालू होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. आगीत गॅरेजमधील बऱ्याच वस्तुचे नुकसान झाले. अग्निशामक दलाला या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर दलाच्या जवानांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तीन तासाच्या अथक परिश्रमांनतर आग विझविण्यात दलाच्या जवानांना यश आले. एका बंबचा वापर करण्यात आला.