म्हापसा: नवीन 'लुक' देण्यात आलेल्या व अनेक मोठे फेरबदल केलेल्या मद्य सम्राट विजय मल्ल्या यांच्या कांदोळी येथील किंगफिशर व्हिलात त्याच्या लिलावानंतर सदर व्हिला विकत घेतलेले नवे मालक अभिनेते तसेच उद्योजग सचिन जोशी त्याचे नवीन नामकरण करणार आहे. येत्या आठवड्याभरात त्याची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
आठ महिन्यापुर्वी जोशी यांनी किंगफिशर व्हिला ७३.०१ कोटी रुपयांच्या लिलावातून खरेदी केला होता. त्यानंतर त्यात त्यांनी अनेक फेरबदल करण्याचे काम सुरु केले होते. सुरु केलेले फेरबदल पूर्णत्वाच्या मार्गावर असून नामकरणानंतर ते त्याचा वापर सुरु करणार आहेत. वापर करताना त्याचा व्यवसायीक वापर होणार की खाजगी वापर याचाही उलगडा नामकरणा दरम्यान होण्याची शक्यता आहे. सध्या सुरु असलेले काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
कांदोळी येथील किनाºयावर परिसरातील महत्वाच्या अशा ठिकाणावर १२,३५० चौरस मीटर क्षेत्रात किंगफिशर व्हिला कोट्यावधी रुपये खर्च करुन विजय मल्ल्या यांनी उभारलेला होता. सर्व सुखसोयींनी युक्त अशा या व्हिलाचा विजय मल्ल्या आपल्या गोव्यातील वास्तवा दरम्यान वापर सुद्धा करीत होता. तसेच पार्ट्यांचेही आयोजन त्यावर केले जायचे. त्यात अनेक नामांकित व्यक्तीमत्वे आपली उपस्थिती लावत होते.
बँकांचे कर्ज थकवून लंडनला गेल्यानंतर भारतीय स्टेट बँकेने गेल्या वर्षी मे महिन्यात ताब्यात घेतल्यानंतर व्हिला लिलावासाठी काढला होता. तीनवेळा लिलाव पुकारुन सुद्धा कोणीच हा व्हिला खरेदी करण्यासाठी पुढे येत नव्हता. शेवटी सचिन जोशी यांनी त्यावर आपली बोली लावून तो या वर्षा एप्रील महिन्यात खरेदी केला होता. बँकेने व्हिलातून ताब्यात घेतलेल्या सामानाचा वेगळा लिलाव केला होता.
जेएमजे उद्योग समूहाचे भागीदार असलेल्या जोशी यांनी अनेक चित्रपटातून वेगवेगळ््या भुमिका साकारलेल्या आहेत. त्यात हिंदी तेलगू चित्रपटांचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार जोशी यांनी त्यात आपल्या हवे तसेच बरेच मोठे फेरबदल केले आहेत. जुना लुक बदलून त्याला नवीन लुक देताना त्यात नवी बांधकामे करण्यात आली आहेत. तसेच दुरुस्त्यांही केल्या आहेत. लिलावानंतर व्हिला ताब्यात घेताना त्यात बदल करण्याचे संकेतही जोशी यांनी दिले होते. जेएमजे गु्रपच्या नेतृत्वाखाली देशभरात अनेक कंपन्या कार्यरत आहेत. सचिन जोशी हे किंग्स बियर चे मालकही आहेत.