लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: गोव्यात येऊन खा, प्या आणि मजा करा हे पर्यटन नाही. येथील वारसास्थळांना भेट दिल्यावर येथे वेगळेच पर्यटन असल्याचे पर्यटकांना समजणार असल्याचे प्रतिपादन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले.
'गोवा सैमिक दायज' यात्रेतर्गत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सासष्टी व केपे तालुक्याला भेट देऊन धार्मिक स्थळे, पुरातन ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली. या भेटीवेळी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, एल्टन डिकॉस्ता, बाबू कवळेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या भेटीत राज्यपाल पिल्लई म्हणाले, एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य हे जागतिक कल्याणाचा मार्ग प्रशस्त करेल. गोव्यातील बेटांना भेट देण्यास खूप स्वारस्य आहे, त्यासाठीचे कार्यक्रम लवकरच हाती घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यातील धार्मिक स्थळे, पुरातन वारसास्थळे ही राज्याची खरी संपत्ती आहे. ही संपत्ती जतन करून ठेवणे गरजेचे आहे. गेल्या वर्षभरापासून बऱ्याच भागांत दौरे केले आहेत. तसेच भेट दिलेल्या स्थळांचा अभ्यासही केला आहे. त्यावर आपण पुस्तकाच्या रूपात खास आवृत्ती तयार करणार आहोत, असे राज्यपालांनी सांगितले.
फातोर्डातील दामोदर लिंग हे एक धार्मिक स्थळ आहे. २०१० मध्ये यदुवंशी यांनी एक सर्वेक्षण केले होते. ४३७ धार्मिक स्थळे असल्याची नोंदणी त्यांनी सर्वेक्षणात केली होती. त्यात फातोर्डातील दामोदर लिंगाचा समावेश आहे. सरकारने हे धार्मिक स्थळ म्हणून घोषित करावे. त्यासाठी आपण राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना येथे बोलावून घेतले होते. सरकारने दामोदर लिंग व तळीचा विकास करावा, हेच आपले उद्दिष्ट असल्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"