वासुदेव पागी, पणजी: गोव्यात खनिज घोटाळ्यानंतर दुसरा मोठा घोटाळा ठरलेला जमीन बळकाव प्रकरणात घोटाळेबाजांनी हडप केलेली ३९ कोटी रुपये किंमतीची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) जप्त करणयात आली आहे. या घोटाळ्यात मनी लॉंड्रिंगचाही वापर झाल्यामुळे असल्यामुळे इडीमार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.
अपेक्षेनुसार गोव्यातील जमीन बळकाव प्रकरणात ईडीची कारवाई सुरू झाली आहे. राज्यात बेकायदेशीरपणे जमीन संपादित करणाऱ्या लोकांविरुद्ध मनी लाँड्रिंग कायदा कलम ३१ अंतर्गत स्थावर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू झाली आहे. आतापर्यंत अशा ३१ स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्तेचे एकूण मूल्य ३९.२४ कोटी रुपये होत असल्याचे इडीकडून जाहीर करण्यात आले आहे.
बनावट कागदपत्रांचा वापर करून गोव्यात मोठ्या प्रमाणावर जमिनी हडप करण्याचा सपाटा सुरू करण्यात आला होता. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी गोवा सरकारने आयपीएस अधिकारी अधीक्षक निधीन वालसान यांच्या नेतृत्वाखाली समिती नियुक्त केली होती. तसेच चौकशी आयोगही स्थापन करण्यात आला होता. एसआयटीकडून कारवाईचा धडाका ऊडवून देताना छापे आणि अटकांचा धडाका लावला होता. विक्रांत शेट्टी हा या प्रकरणात अटक करण्यात आलेला पहिला संशयित होता. त्यानंतर मोहम्मद सुहेल, राजकुमार मैथी यासह अनेकांविरुद्ध गुन्हे नोंद करून त्यांना अटकही करण्यात आली. अनेकांवर निलंबनाची कारवाहीही झाली. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
एसआयटीकडून गुन्हे व तपास कामाच्या फायली चौकसी आयोगाकडे सोपविल्यानंतर चौकशी आयोगाने या प्रकरणात चौकशी पूर्ण करून सरकारला अहवालही सादर केला आहे. या अहवालावर कार्यवाही करणे बाकी आहे. या बाबतीत सरकार काय भुमिका घेते यावरही बरेच काही अवलंबून आहे.