लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : 'औरंगजेबमधील औ' असा मजकूर पाठ्यपुस्तकात आल्याचे काही पुस्तकातील छायाचित्रे व्हायरल झाल्यामुळे त्या पाठ्यपुस्तकांचा शोध घेण्याचे प्रयत्न शिक्षण खात्याकडून चालू होते. मात्र तसे पुस्तकही मिळाले नाही आणि ते पुस्तक शिकविणारी शाळाही शिक्षण खात्याला अद्याप मिळालेली नाही.
पाठ्यपुस्तकात अक्षर ओळख शिकविण्यासाठी औरंगजेबच्या नावाचा वापर करण्यात आल्याचे दाखविणारे फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात 'औ' औरंगजेब असे लिहिण्यात आले होते. त्यावर लोकांच्या कठोर प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. त्यामुळे शिक्षण खात्याला त्याची दखल घ्यावी लागली होती. शिक्षण खात्याकडून आपली सर्व यंत्रणा वापरून त्या पुस्तकाची आणि ते पुस्तक शिकविणाऱ्या विद्यालयाची माहिती घेण्याचे प्रयत्न केले. स्थानिक भाग शिक्षण अधिकाऱ्यांना याविषयी शोध घेऊन अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. बाराही तालुका भाग शिक्षण अधिकारी याविषयी माहिती सादर करू शकले नाहीत.
'औ' औरंगजेब प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हाच मुख्यमंत्री सावंत यांनी या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचा आदेश शिक्षण खात्याला दिला होता. सध्या हे कथित पुस्तक गोव्यात न वापरलेले असण्याची शक्यता आहे. तसेच फोटोशॉपद्वारे तसे चित्र करून सोशल मीडियावर टाकले जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.