किशोर कुबल, पणजी : भारतातून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २००८ पासून लक्षणीय वाढत चालली असून गेल्या वर्षी ३ लाख ३० हजार भारतीय विद्यार्थी अमेरिकेत गेले. अमेरिकेचे मुंबईतील कोन्सुल जनरल माइक हॅन्की सध्या गोवा भेटीवर असून त्यांनी पत्रकारांची संवाद साधताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, अमेरिकन वाणिज्य दूतावास आणि भारतातील दूतावासाने भारतीयांकडून दहा लाखांहून अधिक व्हिसा अर्जांवर प्रक्रिया केली आहे.
हॅन्की म्हणाले की, व्हिसा प्रक्रिया आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्रिय उपाय काढले जात आहेत. व्हिसाची प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. व्हिसा नूतनीकरणाच्या बाबतीत काही जणांना मुलाखतीच्या संदर्भात मुभा देण्याचाही विचार चालू आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांवर भर देताना म्हणाले की, 'आम्ही उभय देशांमधील चिरस्थायी संबंधांना महत्त्व देतो. तसेच समृद्धी आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करतो.विद्यार्थी व्हिसातील वाढ उभय देशांमधील शैक्षणिक देवाणघेवाण वाढवण्याची व्यापकता संरेखित करते. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत ३५ टक्के वाढ झाली आहे. दोन्ही राष्ट्रांमधील मजबूत शैक्षणिक संबंध आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यातून अधोरेखित होते.
भारतातील अमेरिकन मिशनने २०२३ मध्ये १२ लाखांहून अधिक नॉन-इमिग्रंट (अभ्यागत) व्हिसावर यशस्वी प्रक्रिया केली. तर केवळ मुंबईतील यूएस कॉन्सुलेट जनरल कार्यालयाने गेल्या वर्षी एकूण ४ लाख व्हिसांवर प्रक्रिया केली. हा एक विक्रमच ठरला आहे, असे ते म्हणाले.
'द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होणार'
द्विपक्षीय संबंधाबाबत विचारले असता हॅन्की म्हणाले की, नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील ,अशी अपेक्षा आहे. गेल्या दोन दशकांमध्ये जॉर्ज बुश, बराक ओबामा, ट्रम्प (त्यांच्या पहिल्या कार्यकाळात) किंवा ज्यो बिडेन यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ असो भारताशी अमेरिकेचे संबंध नेहमीच चांगले राहिलेले आहेत.
अमेरिकेतील भारतातील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे तसेच तंत्रज्ञान देवाण-घेवाण सहकार्यही वाढले आहे. माइक हॅन्की यांनी २०२२ मध्ये रोजी मुंबई येथे अमेरिकन कॉन्सुल जनरल म्हणून सूत्रे हातात घेतली. ओमानमधील अमेरिकन दूतावासात त्यांनी डेप्युटी चीफ ऑफ मिशन म्हणून काम केले आहे.