लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : राज्यातील सर्वात प्रगत मतदार संघांपैकी एक असलेल्या साखळी मतदार संघासह साखळी शहरात आधुनिक व नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात यश आले आहे. स्वयंपूर्ण व आत्मनिर्भरतेवर भर देणारे प्रकल्प राबविले जात असून, मानवी विकासाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात शिक्षण, कला, संस्कृती, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सबलीकरण, युवा केंद्रबिंदू योजना अशा चौफेर क्षेत्रातील विकासाला चालना दिली आहे, असे मुख्यमंत्री तथा साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी संगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'केजीपासून पीएचडीपर्यंतची शिक्षण व्यवस्था येथे आहे. नर्सिंगसह इतर कौशल्य विकासाचे, शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. खाण पीठातील पाणी शेतीसाठी वापरण्याचा देशातील पहिला प्रकल्प येथे राबविला आहे. कुणबी साडी बनविणे, फणस प्रक्रिया प्रकल्प, सामूहिक शेती, सहकार, कला-क्रीडा, सामाजिक आरोग्य सुविधा, योग शिक्षण, आदर्श पायाभूत सुविधा, भुयारी वीज वाहिन्या, चकाचक रस्ते यासाठी प्रयत्न केलेले आहेत,' असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
"प्रत्येक पंचायत विभागात स्वयंपूर्ण मित्र शेती, बागायती, जलसिंचन, समूह शेती, धवल, हरितक्रांती, गरजूंना आधार, महिला, स्वयंसहाय्य गट आदींना विविध उपक्रमांद्वारे स्वयंपूर्ण करत कौशल्य विकासाला चालना देण्यात आलेली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. खाण व्यवसाय नव्याने सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. त्यातून शेकडो लोकांना दिलासा मिळेल. युवा शक्तीला विविध उद्योगात सामावून घेण्यात येत आहे. पडिक शेती लागवडीखाली आणली जात आहे.
आदरातिथ्य क्षेत्रात अनेक संधी आहेत. आरोग्य क्षेत्रातील तांत्रिक प्रशिक्षण व प्रोत्साहन तरुणांना देऊन रोजगाराच्या शंभर टक्के संधी देण्यात येत आहेत. स्वयंपूर्णतेचे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
बहुतांश योजना पूर्ण
मतदार संघातील बहुतेक योजना पूर्ण झाल्या आहेत. पाळी येथे दहा कोटींचा नवा जलप्रकल्प या भागासाठी वरदान ठरेल. मुख्यमंत्री म्हणून काम करताना मतदार संघातील प्रत्येक गावाचा विकास साधण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आणखी काही नवे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. या विकासप्रकल्पांतून साखळी सुंदर बनेल, राज्यात आदर्श बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.