मडगाव : मणिपूरच्या राजकीय घडामोडीनंतर गोव्यातही भाजपाची स्थिती तशीच होणार आहे. अशा परिस्थितीत भाजपाचेच आठ आमदार उड्या मारण्याच्या तयारीत आहेत, असा दावा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.
गोवा फॉरवर्डचे दोन आमदार फुटून भाजपात जाणार असे वृत्त पसरलेले असताना सरदेसाई यांनी हा गौप्यस्फोट केला . ते म्हणाले, नवीन राजकीय परिस्थितीत स्वतःचा पक्ष त्यागून भाजपात गेलेले 12 आमदार अपात्रतेच्या कचाट्यात सापडले आहेत. या परिस्थितीत भाजपा हे बुडणारे तारू हे सर्वांनाच माहीत आहे, अशा परिस्थितीत त्या बुडणाऱ्या तारूत उडी घेऊन कोण आत्महत्या करेल असा प्रतिसवाल त्यांनी केला.
गोवा फॉरवर्डचे जयेश साळगावकर व विनोद पालयेकर हे दोन आमदार भाजपात येऊ पाहत होते. पण भाजपाने त्यांना पक्षात घेऊ नये असे आपण पक्षाला सांगितले, असे वक्तव्य मंत्री मायकल लोबो यांनी केले होते. त्यावर बोलताना सरदेसाई म्हणाले, लोबो याना मंत्रिपद मिळावे यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या 10 जणांना फोडले. आता त्यांना त्यांच्या मतदारसंघात त्याचे परिणाम भोगावे लागतात. यासाठीच आपण यात नाही हे सांगण्यासाठीच लोबो असे बोलतात.
भाजपाला आपले दोन आमदार हवे असते. तर त्यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळातून हाकलून का लावले? असा सवाल करून लोबो याना मंत्री करण्यासाठी मी माझ्या पक्षातील या मंत्र्यांना काढून टाकावे असा माझ्यावर दबाव त्यावेळी आणला जात होता. पण त्या दबावाला भीक न घातल्यानेच आम्हाला मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ते म्हणाले, या सरकारचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक, अशा तिन्ही बाजूने आरोग्य डळमळीत झाले आहे. 12 आमदार अपात्रतेच्या कात्रीत सापडल्याने त्यांचे राजकीय आरोग्य धोक्यात आहे. गोव्यात कोरोनाची स्थिती प्रभावीपणे हाताळू न शकल्याने राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या शून्यवरून 800 वर पोहोचल्याने सामाजिक आरोग्यही धोक्यात आहे आणि आर्थिक स्थिती डळमळीत झाल्याने राज्यातील विकासकामे 2021 पर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.
याचमुळे भाजपात अस्वस्थता पसरली आहे. यामुळे त्यांचेच 8 आमदार फुटू पाहत आहेत . एका आमदाराने तर आपण निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे असे म्हटले आहे . अशा कात्रीत भाजपा सापडल्याने दुसऱ्या पक्षातील आमदार फुटणार, असल्याचे सांगत आहे, असे सरदेसाई म्हणाले.
आणखी बातम्या...
कोरोनाचा 'या' विमान कंपनीला फटका; सहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार
ठाकरे मंत्रिमंडळाने घेतले 12 महत्त्वाचे निर्णय; वस्तू व सेवाकर अधिनियमात मोठी सुधारणा
शेतकऱ्याची कमाल! पिकवले अनोखे 'कलिंगड', बाहेरून 'हिरवे' अन् आतून 'पिवळे'
आयुक्तांच्या बदल्यांमागे एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्याचा प्रयत्न - प्रवीण दरेकर