किशोर कुबल/पणजी: पर्यटन खात्याने उत्तर गोव्यातील किनाय्रांवर आणखी नव्याने या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या विना अनुभवींना ८ शॅक देऊ केले आहेत. मोरजी, मांद्रे, हरमल व केरी किनाय्रांवर प्रत्येकी २ शॅक दिले जातील. त्यासाठी अर्जही मागवण्यात आले आहेत.
पर्यटन खात्याने ७ नोव्हेंबर रोजी ड्रॉ काढून उत्तर गोव्यात २५५ व दक्षिण गोव्यात ९८ शॅक्सचे वांटप केले होते. आता २०२३-२६ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी उत्तर गोव्यात आणखी ८ शॅक्सचे वांटप केले जाईल. बीच शॅक धोरणाखाली पात्र असलेल्यांनी १६ ते २० या कालावधीत जीईएल, पर्यटन भवन, पाटो येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन खात्याने केले आहे. या आठ शॅक्ससाठी ड्रॉ २५ रोजी सकाळी १०.३० वाजता काढला जाईल. किनाय्रांवर प्रत्यक्षात शॅक उभारणी करुन ते सुरु होईपर्यंत नंतर आणखी महिनाभर तरी जाईल, असे सांगण्यात आले.
२०२३-२६ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किनाय्रांवर हंगामी शॅक, डेक बेड आणि छत्र्यांच्या उभारणीसाठी वांटप झालेले आहे. धोरणानुसार दहा टक्के शॅक एक ते चार वर्षांचा अनुभव असलेल्यांना, दहा टक्के शॅक अनुभव नसलेल्यांना किंवा प्रथमच या व्यवसायात येऊ इच्छिणाय्रांना तसेच उर्वरित शॅक पाच वर्षे किंवा त्याहून अधिक अनुभव असलेल्या अनुभवी शॅक ऑपरेटरना देण्यात आले आहेत.