पणजी : वेगवेगळ्या खाणी तसेच जेटींच्या ठिकाणी असलेल्या खनिजाचा आठवा ई-लिलाव मंगळवार, ८ रोजी होत असून ११ लाख २ हजार ४७५ टन खनिज विक्रीस काढले जाणार आहे. या ई-लिलावात विक्रीला काढला जाणारा माल वेगवेगळ्या खाणींच्या ठिकाणी तसेच जेटींवर आहे. कुडणे, डिचोली, सुर्ला, साखळी, शिरगाव, कष्टी-सांगे, बिंबल, सोनूस, डिंगणे, तोळे आदी खाण प्रकल्पांच्या ठिकाणी तसेच शिरसई, सारमानस, वाघुस आदी जेटींवर हा माल लंप्स आणि फाईनच्या स्वरूपात आहे. सर्वाधिक खनिज कोडली खाणींवर आहे. तब्बल ६ लाख ५५ हजार टन खनिज केवळ कोडली येथील खाणींवर विक्रीस आहे. या आधीच्या सात ई-लिलावांमध्ये सुमारे ६0 लाख टन खनिज विकले गेले असून त्यातून ८00 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. उरलेल्या खनिजातून आणखी किमान ६00 कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व खनिजमालाचा लिलाव पूर्ण करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली आहे; परंतु तूर्त जेवढ्या संथपणे लिलाव प्रक्रिया चालली आहे, ते पाहता ते शक्य नसल्याचेच दिसते. दरम्यान, खनिज ई-लिलावात गोव्याबाहेरील ट्रेडर्सकडूनही खनिज उचल होत असल्याचे आतापर्यंतच्या लिलावांतून दिसून आले आहे. गोव्यातील निर्यातदारांबरोबरच बगाडिया, कलिंगा अलाईड इंडस्ट्रिज, रॉयलिन रिसोर्स, जेएसडब्ल्यू स्टील आदी परप्रांतीय कंपन्यांनीही बोली लावून खनिज उचलल्याचे दिसून आले आहे. सेसा वेदांताबरोबरच साळगावकर, फोमेन्तो, अगरवाल आदी गोमंतकीय कंपन्या खनिजासाठी बोली लावतात; परंतु त्याचबरोबर परप्रांतीय कंपन्याही उत्सुकता दाखवत आहेत. या ई-लिलावात ४५ ग्रेडपासून ६५ ग्रेडपर्यंतचे खनिज विक्रीस काढण्यात आले आहे. गोव्यातील बहुतांश खनिज कमी श्रेणीचे असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर कमी मिळतो. (प्रतिनिधी)
खनिज मालाचा आठवा ई-लिलाव आज
By admin | Published: September 08, 2015 1:58 AM