ऑनलाइन लोकमत
पणजी,दि.16 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगाने निवडणूक आचारभंग करण्याच्या प्रकरणात नोटीस बजावली आहे. गोव्यात साखळी येथील सभेत त्यांनी मतदारांना इतर पक्षांनी पैसे दिल्यास ते स्वीकारण्याचे आवाहन केले होते.
'निवडणुकीत कुणी पैसे घेऊन आले तर ते नको म्हणू नका, पाच हजार दिल्यास तीन पटीने अधिक मागणी करा आणि नव्या करकरीत नोटा घ्या, परंतु मतदान मात्र आम आदमी पार्टीच्या झाडूसाठीच करा' असे आवाहन केजरीवाल यांनी साखळी येथील जाहीर सभेत केले होते. मतदारांना पैसे घेण्याचे आवाहन करून त्यांनी आचारसंहिता तोडल्याची तक्रार भाजपने केली होती. भारतीय निवडणूक आयोगाला आॅनलाईन पद्धतीनेही तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन आयोगाने ही त्यांना नोटीस बजावली आहे.
केजरीवाल यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचे तक्रारीत सोबत देण्यात आलेल्या सीडीतून स्पष्ट होत आहे असा आयोगाचा निष्कर्श आहे. त्यामुळे १९ रोजी आयोगाच्या नवी दिल्ली येथील कार्यालयात दुपारी १ वाजता त्यांना उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याची सूचना करण्यात आली आहे.