मडगाव: दक्षिण गोव्यातील राय येथील चर्चचे पाद्री फा. कोसेन्सांव डिसिल्वा यांच्या विद्वेशपूर्ण उपदेशासंदर्भात जे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, त्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली असून यासंदर्भात दक्षिण गोव्याचे निवडणूक अधिकारी असलेले जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी चौकशी सुरु केली आहे. विद्वेशपूर्ण भाषणांचे एकूण चार व्हिडिओ निवडणूक आयोगासमोर आले आहेत.यासंदर्भात रॉय यांच्याशी संपर्क साधला असता, निवडणूक यंत्रणोने या व्हिडिओची गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात चौकशी सुरु केली आहे. मात्र सध्या तरी कुणालाही समन्स जारी केलेले नाहीत असे त्यांनी सांगितले. रॉय लवकरच आपला अहवाल आयोगाला सादर करणार आहेत.फा. डिसिल्वा यांनी चर्च पल्पीट (मंच)चा वापर करीत वास्को येथील कोळसा प्रदुषणाचा उल्लेख करत भाजपाला मतदान न करण्याचे आवाहन केले होते. भाजप राजवटीत राज्यात प्रदुषण वाढले. ख्रिस्ती लोकांच्या सार्वजनिक सुट्ट्या कापल्या अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाने त्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.दक्षिण गोव्यातील निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, सुरुवातीला एकाच व्हिडिओवर आधारित तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर अशाच प्रकारचे आणखी तीन व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याचे दिसून आल्यानंतर या व्हिडिओंच्या प्रतीही आयोगाला पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. फा. डिसिल्वा यांच्या कृतीचा चर्चसंबंधित असलेल्या संघटनांनीही निषेध केला असून चर्चच्या मंचाचा केलेला हा गैरवापर अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.