पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला, असे वृत्त दै. लोकमतने गेल्या २७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केल्यानंतर निवडणूक आयोगाचे गोवा मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल (आयएएस) यांनी तत्काळ गंभीर दखल घेऊन चौकशीसाठी पाच सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमली आहे. सविस्तर चौकशी करून आपल्याला अहवाल सादर करावा, असे त्यांनी समिती स्थापनेसंदर्भातील आदेशात म्हटले आहे.यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनीही निवडणूक खर्चाविषयी काही प्रश्न उपस्थित केले होते. निवडणुकीवेळी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने नेमका किती खर्च केला याविषयीची माहिती संकेतस्थळावर दिली जावी, अशी मागणी रॉड्रिग्ज यांनी केली होती. गेल्या २७ रोजी लोकमतने निवडणूक खर्चाचा आढावा घेतला. भाडोत्री वाहनांसाठी पाच कोटी रुपये, इंधनावर चार कोटी रुपये आणि किरकोळ खर्च तर तब्बल दहा कोटी रुपये, असा खर्च झाल्याची माहिती प्राथमिकदृष्ट्या मिळाली होती. मात्र, या माहितीला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. आयरिश रॉड्रिग्ज यांनी निवडणूक आयोगालाही दिल्लीत पत्र पाठवून खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने बहुतेक वाहने भाडेपट्टीवर घेतली होती. त्यात पस्तीस बसगाड्या तसेच चारशे मोटारींचा समावेश आहे. मतदान केंद्रांवर छोटे मंडप उभारण्यासाठी साडेचार लाख रुपये खर्च केले गेले. स्टेशनरी साहित्य खरेदीसाठी चौदा लाख रुपये खर्च केले गेले. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांवर सात लाख रुपये, निवडणूक कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांवर सुमारे पाच कोटी रुपये, अशा प्रकारे विविध कारणांस्तव खर्च झाला आहे. सुरक्षेवरही मोठा खर्च झाला आहे. पोलिसांना दरदिवशी १४० रुपये भत्ता याप्रमाणे ८४ लाखांचा खर्च झाला. निवडणुकीवेळी ४० कोटींच्या खर्चाची तरतूद मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने केली होती. प्रत्यक्षात जास्त खर्च झाल्याचा दावा केला जातो. एवढा खर्च गरजेचा होता काय, हा खर्च अवास्तव झालेला आहे का, तसेच काही खर्च वाढीव प्रमाणात दाखविला का, या सगळ्यांची चौकशी संबंधित समिती करील, असे सूत्रांनी सांगितले. चौकशी समितीवर एकूण पाच अधिकारी असून त्यात संयुक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसह, अर्थ विभागाचे नोडल अधिकारी, मतदान केंद्रांच्या साहाय्यक नोडल अधिकारी, साहाय्यक लेखा अधिकारी आदींचा समावेश आहे. समितीने चौकशीचे प्राथमिक काम सुरू केले आहे. समिती आपला अहवाल कुणाल यांना सादर करील. (खास प्रतिनिधी)
निवडणूक खर्चाची चौकशी
By admin | Published: March 03, 2017 1:44 AM