पणजी : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वाटय़ाला जी स्थिती आली ते पाहून गोव्यात काँग्रेसजनांचा उत्साह वाढला आहे. गोव्यात आजारी पर्रिकर सरकारविरुद्ध गेले काही महिने जोरदारपणो लढणा:या काँंग्रेसचे बळ आता आणखी वाढेल हे स्पष्ट आहे. छत्तीसगढ व इतरत्र भाजपची सत्ता जाते व काँग्रेसला मोठय़ा राज्यांत पुन्हा चांगले दिवस येतात हे पाहून गोव्यातील प्रदेश काँग्रेसमध्येही आनंद व्यक्त होऊ लागला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष 17 जागा जिंकला होता. काँग्रेसच सत्तेचा दावेदार होता, कारण भाजपचे केवळ तेरा आमदार निवडून आले होते. मात्र गोवा फॉरवर्ड व मगोप ह्या प्रादेशिक पक्षांना व दोघा अपक्षांना भाजपने ऐनवेळी स्वत:च्या बाजूने वळविले व सरकार स्थापन केले पण गेले वर्षभर मुख्यमंत्र्यांचा आणि अन्य मंत्र्यांचा आजार यामुळे भाजप टीकेचा धनी ठरला. काँग्रेसचे बळ कमी करण्यासाठी भाजपने गेल्या ऑक्टोबर महिन्यात गोव्यातील काँग्रेसचे दोन आमदार फोडले. मात्र गोव्यातील काँग्रेसने जन आक्रोश मोहीम सुरू करून स्वत:च्या कार्यकर्त्यांना नव्याने संघटीत करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना लोकमतने प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले की छत्तीसगढ, मध्य प्रदेश किंवा राजस्थानमध्ये लोकांचा कौल पाहता, मतदारांनी भाजपची घमेंड जिरवली आहे. मतदारांना गृहित धरण्याच्या भाजपच्या वृत्तीला मोठी चपराक मतदारांनी दिली आहे. केंद्रातील भाजपचा हा पराभव आहे. आरबीआय, सीबीआयसारख्या संस्था मोदी सरकारने संपविल्या. देशाला ज्या अराजकतेच्या दिशेने केंद्र सरकार नेऊ पाहत होते, त्याला लोकांनीच वेसण घातली. याचा परिणाम निश्चितच गोव्यातही होणार आहे. गोव्यात सरकार अस्तित्वातच नसल्यासारखी स्थिती आहे. गोमंतकीयांना पर्रिकर सरकारने आणखी गृहित धरू नये.