ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सर्वांचेच लक्ष उत्तरप्रदेशच्या निकालाकडे आहे. सकाळी आठवाजता मतमोजणी सुरु झाल्यानंतर 11 वाजेपर्यंत जनमताचा कौल कोणाकडे आहे ते स्पष्ट होईल.
बहुतांश एक्झिट पोल्सनी उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपाला सरकार स्थापनेची संधी असल्याचे म्हटले आहे. पंजाबमध्ये सत्तांतर होऊन काँग्रेस किंवा आपला संधी मिळण्याची शक्यता आहे.
पाच राज्यांचे हे निकाल कोणासाठी किती महत्त्वाचे आहेत?
भाजपा : राज्यसभेत बहुमत मिळवण्यासाठी अधिकाधिक राज्ये आपल्या हाती राहावीत, असा भाजपाचा प्रयत्न आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये तर भाजपाने आपली प्रतिष्ठाच पणाला लावली आहे.
काँग्रेस : एक-एक राज्य हातातून जात असलेल्या काँग्रेसला आपली राष्ट्रीय प्रतिमा कायम ठेवायची असून, त्यासाठी पंजाब मिळवतानाच, उत्तराखंड, मणिपूर, गोवा यांच्यावर काँग्रेसचा डोळा आहे. शिवाय अखिलेश यांच्या मदतीने उत्तर प्रदेशच्या सत्तेत २८ वर्षांनी शिरकाव करण्याची काँग्रेसची इच्छा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट शिल्लक नाही, असे दिसणे काँग्रेसला गरजेचे वाटत आहे.
5 राज्यांचे गणित असे...
- पंजाबमध्ये मात्र सत्तापालट होणार, हे निश्चित आहे. मतदान सुरू होण्याच्या आधीच अकाली दल व भाजपा यांना त्याची कल्पना आली होती. बहुधा त्याचमुळे पंजाबमध्ये आम्हाला सत्ता मिळेल, असा दावा भाजपाचे नेतेही करायला तयार नाहीत. तिथे अकाली व भाजपा यांना १५ पेक्षाही कमी जागा मिळतील आणि काँग्रेस व आप यांच्यापैकी एक पक्ष सरकार बनवेल, असे हे पोल सांगत आहेत. मात्र त्यातही काँग्रेसची शक्यता अधिक वर्तवण्यात येत आहे.
- गोव्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष असेल, पण त्याला बहुमत मिळणार नाही, असे पोल सांगत असले तरी आम्हाला किमान २२ जागा मिळतील, असा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा दावा आहे. दुसरीकडे काँग्रेसने गोव्यात आमचा विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे.
- उत्तराखंडमध्ये भाजपाच पुढे असेल, असे एक्झिट पोल सांगत असले तरी तेथील मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते हरीश रावत यांनी आपल्या पक्षाचे किमान ४२ आमदार निवडून येतील, असा दावा केला आहे. त्या राज्यात बहुमतासाठी ३६ हा आकडा गाठणे आवश्यक आहे.
- उत्तर प्रदेशमध्ये भाजपा बहुमताच्या जवळ जाईल, अशी शक्यता एक्झिट पोल्सनी वर्तवली असली तरी बहुसंख्य जाणकारांना त्या राज्यांत कोणालाच बहुमत मिळणार नाही, असेच वाटत आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आमच्या आघाडीलाच बहुमत मिळेल, असा दावा केला आहे. भाजपाला रोखण्यासाठी प्रसंगी आम्ही मायावती यांची मदत घ्यायचा विचार करू, असे अखिलेश यांनी म्हटले असले तरी बसपाने आपली भूमिका जाहीर केलेली आहे. अखिलेश यांच्या वरील वक्तव्यातून सपाला बहुमत मिळणार नाही, हेच स्पष्ट होते, असे भाजपाने म्हटले आहे.
- मणिपूर हे ईशान्येकडील राज्य टिकवण्यात काँग्रेसला यश येते का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तेथे भाजपा सत्तेच्या जवळ दिसत असली तरी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते ओबोबी सिंग यांनी आम्हीच सत्तेवर येणार, असे म्हटले आहे.