पणजी : राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायतींसाठी येत्या १२ रोजी मतदान होईल हे राज्य निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग यांनी शनिवारी जाहीर केले. त्याचबरोबर ४८ जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये आचारसंहिता लागू झाली. १४ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. जे मतदार मतदान केंद्रावर मास्क घालून येणार नाहीत, त्यांना मतदान करता येणार नाही असेही आयुक्तांनी जाहीर केले.
आयुक्त गर्ग यांनी निवडणूक आयोगाचे सचिव मेल्वीन वाझ व इतरांसोबत येथे पत्रकार परिषद घेतली. निवडणूक १२ डिसेंबरलाच होईल असे वृत्त लोकमतने दिले होते. तथापि, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी निवडणूक जानेवारीत घ्यावी अशी सूचना केली होती. सरकारने व आयोगानेही ती सूचना फेटाळली.
आयोगाने शनिवारी सायंकाळी पाच वाजता निवडणूक जाहीर केल्याने त्यावेळपासूनच राज्यातीलजिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये आचारसंहिता लागू झाली. पालिका क्षेत्रांमध्ये ही आचारसंहिता लागू होत नाही. यापुढे जाहीरपणे प्रचार करता येणार नाही. सभा किंवा कोपरा बैठका घेता येणार नाहीत, असे गर्ग यांनी सांगितले. राज्यात एकूण ५० जिल्हा पंचायत मतदारसंघ असले तरी, सांकवाळ मतदारसंघात अगोदरच उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे तर नावेलीत रिंगणातील एका उमेदवाराचे निधन झाल्याने तेथील निवडणूक रद्द झाली आहे. तिथे मग पोटनिवडणूक होईल पण तूर्त राज्यातील ४८ झेडपी मतदारसंघांत निवडणूक होईल. उमेदवार वगैरे पूर्वीचेच असतील. लॉकडाऊन आल्यामुळे व कोविड संकटामुळे मतदान घेता आले नव्हते. आता सगळी खबरदारी घेऊन व आरोग्य खात्याच्या एसओपीचे पालन करून मतदान घेतले जाईल, असे गर्ग यांनी सांगितले.
मतपत्रिकांचा वापर केला जाईल. प्रत्येक मतदाराने तोंडाला मास्क बांधूनच मतदान करण्यासाठी यावे. मतदाराची ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्रावर क्षणभर मास्क काढण्यास परवानगी असेल. मात्र मास्क घातले नाही तर मतदान करू दिले जाणार नाही. घरातून बाहेर पडताना जर कुणी मास्क घातले नाही तर दोनशे रुपयांचा दंड पोलिस देतीलच पण मतदानही करता येणार नाही, असे गर्ग म्हणाले.
कोविडग्रस्तही मतदान करतील-
दरम्यान, जे कोविडग्रस्त आहेत, त्यांना देखील मतदान करता येईल. सकाळी आठ वाजता सर्व मतदान केंद्रांवरून प्रक्रिया सुरू होईल. मात्र जे कोविडबाधित होम आयसोलेशनमध्ये आहेत, त्यांना सायंकाळी मतदान संपण्याच्यावेळी म्हणजे शेवटच्या टप्प्यात मतदान करू दिले जाईल. ते मतदान केंद्रावर येऊ शकतील, असे गर्ग यांनी सांगितले. सध्याची निवडणूक आचारसंहिता ही दि. १४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू असेल. मतमोजणी विविध ठिकाणी होणार आहे.