लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : शहरातील रस्त्यांवर आज, एक जुलैपासून कदंब महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. टप्प्या-टप्याने या बसेस वाढविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात सहा बसेस धावतील, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष उल्हास नाईक तुयेकर यांनी दिली.
या इलेक्ट्रिक बसेस पणजी, दोनापावला, ताळगाव या मार्गावर सर्वसाधारण वेळेनुसार धावतील. राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात स्मार्ट सिटी अंतर्गत इलेक्ट्रिक बसेस १ जुलैपासून धावतील असे नमूद केले होते. त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जात आहे. भविष्यात बसेसची संख्या वाढविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात एक फेब्रुवारीपासून ४८ इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पणजी-ताळगाव, पणजी- दोनापावला, पणजी-मीरामार, पणजी-बांबोळी आदी मार्गावर या धावणार होत्या. या बसेसची आसन व्यवस्था ही अनुक्रमे ४९, ३०, २६, १४ सीट अशी आहे. इलेक्ट्रिक बसेस सुरू झाल्यानंतर शहरासह आजूबाजूच्या परिसरात सध्या धावणाऱ्या डिझेलच्या बसेसची सेवा बंद केली जाईल, असेही स्पष्ट केले होते. या निर्णयाचा खासगी बसमालकांनी तीव्र विरोध केला आहे.
पणजी व परिसरात ७० हून अधिक खासगी बसेस धावतात. त्या बंद झाल्या तर त्यावर अवलंबून असलेल्या खासगी बसमालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. खासगी बसमालकांचा विरोध व लोकसभा निवडणूकची आचारसंहिता असल्याने स्मार्टसिटी अंतर्गत इलेक्ट्रिक बसेस सुरू करता आल्या नव्हत्या परंतु उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतल्याने सरकार सोमवारपासून या बसेस सुरू करत आहे.