पणजी : पर्यावरणपूरक अशा इलैक्ट्रीक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन दिले जात असतानाच आता गोवा सरकारच्या विविध खात्यांकडून वापर होणाऱ्या पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची जागा इलैक्ट्रीक वाहने घेणार आहेत. सध्या अनेक सरकारी खात्यांकडून पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर केला जात आहे. मात्र आता या सरकारी खात्यांना इलैक्ट्रीक वाहनांचा पुरवठा करण्यासाठी एजंसीकडून निविदा मागवल्या आहेत. सर्वात कमी बोली लावणाऱ्या एजंसीला हे कंत्राट मिळेल. इलेक्ट्रीक वाहने वापरण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे.
वीज मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, की सध्या अनेक लोक इलैक्ट्रीक वाहनांचा वापर करीत आहेत. राज्य सरकारच्या काही खात्यांकडून ही इलैक्ट्रीक वाहनांचा वापर होत आहे. मात्र त्याची संख्या कमी आहे. सरकारी खात्यांनी काही वाहने भाडेपट्टीवर घेतली आहे. मात्र ती सुध्दा पेट्रोल व डिझेलवर चालणारीच आहेत. अशा स्थितीत पर्यावरणपूरक अशा इलैक्ट्रीक वाहनांचा वापर व्हावा असे सरकारला वाटत आहे. सरकारने विविध एजंसींकडून इलैक्ट्रीक वाहनांचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागवल्याअसल्याचे त्यांनी सांगितले.