पणजी मार्केटमधील फूलवाले, फळ विक्रेत्यांची वीज तोडलीपणजी : मार्केट इमारतीतील शंभरहून अधिक फूलवाले व फळविक्रेत्यांची वीज सोमवारी खात्याने अचानक कापल्याने या विक्रेत्यांची धांदल उडाली. पंखे नसल्याने दिवसभर उकाड्यात हैराण होऊन व्यवहार करावे लागले. सायंकाळी लवकर विक्री बंद करून घरी परतण्याची वेळ आली. मीटर न घेता वीज चोरी केली जात होती या कारणाखाली ही कारवाई करण्यात आली असली तरी त्याविरोधात विक्रेत्यांनीही दंड थोपटले असून दोन दिवसांत पूर्ववत् वीज जोडणी न दिल्यास सोपो देणे बंद करण्याचा इशारा दिला आहे. मार्केट इमारतीत काही विक्रेत्यांनी मीटर बॉक्स न घेता वीज चोरी आरंभल्याच्या तक्रारी खात्याकडे आल्या होत्या. मार्केट इमारतीचे तब्बल ३ कोटी १२ लाख रुपयांच्या बिलाचीही थकबाकी आहे. ही रक्कम भरण्यासाठी खात्याकडून महापालिकेला नोटीसही गेलेली आहे. सोमवारी खात्याने अचानक या विक्रेत्यांची वीज तोडली. मार्केट इमारतीत पॅसेजमध्ये खुल्या जागेत हे विक्रेते व्यवसाय करीत असतात. फुलवाले आणि फळविक्रेत्यांचाच यात भरणा आहे. एका फूलविक्रेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, रोज ते न चुकता २0 रुपये सोपो भरत असतात. महापालिकेने विजेची सोय करायला हवी, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले. इमारतीत बसविलेले पंखे, ट्युबलाइट्स चालत नाहीत, तसेच वीज जोडण्याही कुचकामी ठरल्या आहेत. वीज मीटर मागितले तरी मंजूर केले जात नाहीत. (प्रतिनिधी)
पणजी मार्केटमधील फूलवाले, फळ विक्रेत्यांची वीज तोडली
By admin | Published: March 07, 2017 1:43 AM