पणजी - राज्यातील प्रशासकीय कारभार कोलमडले असून वीज खाते ‘बंद’ पडले आहे. याचा भुर्दंड सर्वसामान्यांना भरावा लागत आहे. सरकारने केलेली वीज दरवाढ, वीज कर्मचारी क्वाटर्सची दुरुस्ती, मुख्य विद्युत अभियंताकडून पदभार मागे घेणे तसेच अविरत वीजपुरवठा देणे यासारख्या प्रमुख मागण्या करत सोमवारी (१० सप्टेंबर) आम आदमी पक्षातर्फे पणजीत विद्युत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी वीज दरवाढ व अभियंता रेड्डी यांना निवृत्तीनंतर दिलेल्या पदभार या सूचनापत्रांची होळी केली. तसेच आपच्या कार्यकर्त्यांनी मुख्य विद्युत अभियंता एन. निळकंठ रेड्डी यांना घेराव चार कलमी पानांचे निवेदन सादर केले.
याविषयी आपचे गोवा राज्य संयोजक एल्विस गोम्स म्हणाले, राज्यातील प्रशासन ढासळले आहे. वीज मंत्री नसल्याने खात्याला वालीच उरलेला नाही. सातत्याने वीजेचा लंपडाव सुरु आहे. तरीही वीज दरवाढ केली जाते. चतुर्थीच्या काळात लोकांना अविरत वीजपुरवठा द्यावा, अशी आपची मागणी आहे. आज दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने घरपोच चाळीस प्रशासनसेवा सुरु केल्या. मात्र, गोव्यातील सरकारचे तीनतेरा वाजलेले आहे. वीज कर्मचाºयांच्या क्वाटर्सची दुरवस्था झालेली आहे. मुख्य विद्युत अभियंता रेड्डी हे निवृत्त झाले आहेत; तरीही त्यांच्याकडे वर्षभरासाठी अतिरिक्त पदभार सोपविला आहे. या कृतीचा आपकडून निषेध व्यक्त केला जातो, असे त्यांनी सांगितले.
प्रदीप पाडगावकर म्हणाले, सोशल माध्यमातून खंडित वीजपुरवठ्याविषयी सामन्यांकडून तक्रारी केल्या जात आहेत. कुडचडे, डिचोली, आल्त-बेती यासारख्या परिसरात वीज नसल्याने लोक हैरान झाले आहेत. आज सोमवारी सकाळपासून रायबंदर परिसरात वीजपुरवठा खंडित आहे. राज्यातील वीजउपकरणे ही निकामी व जुनी बनली आहेत. ही स्थिती बदलण्याची गरज आहे. निवृत्तीनंतर सुद्धा मुख्य अभियंता रेड्डी यांना पदभार दिला जातो. हे चुकीचे असून ते या पदाच्या लायक नाहीत, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, या वेळी आपच्या कार्यकर्त्यांना सरकारविरोधात घोषणाबाजी दिल्या. तसेच रेड्डी यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली.
कोट :
खात्याकडे वीजपुरवठा खंडितच्या तशा तक्रारी येत नाहीत. ज्या येतात, त्यावर कारवाई केली जाते. १९१२ ही खात्याची हेल्पलाईन सेवा आहे. पण त्यावर तशा तक्रारी नाहीत. वीज कर्मचाºयांसाठी असणाºया क्वाटर्सच्या दुरुस्तीसाठी सरकारने दोन कोटी निधी मंजूर केला आहे. पावसाळ्यानंतर ही कामे हाती घेतली जातील. दोन क्वाटर्सची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. त्यासाठी या संबंधितांचे स्थलांतर करून ते क्वाटर्स पाडून तिथे नवीन बांधकाम केले जाईल. नवीन मुख्य अभियंताला घेण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. विभाग पातळीवर कोणताही अधिकारी नसल्याने नवीन अभियत्यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्याकडे केवळ पदभार सोपवला आहे.
- एन. निळकंठ रेड्डी, मुख्य विद्युत अभियंता