पणजी : गोव्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर समावेश झालेल्या तिन्ही मंत्र्यांना आज खातेवाटप करण्यात आले. सुदिन ढवळीकर यांना वीज खाते देण्यात आले आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे जेष्ठ आमदार असलेले सुदिन ढवळीकर यांना भाजपमधून वीज खाते देण्यास तीव्र विरोध होता.
गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल ११ मार्च रोजी जाहीर झाला. त्याच दिवशी मगोपने भाजपला सरकार स्थापण्यासाठी पाठींबा दिला. परंतु सुदिन ढवळीकर यांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला नव्हता. त्यांना मंत्रिमंडळात घेण्यापासून ते महत्त्वाची खाती देण्यापर्यंत भाजपमधून तीव्र विरोध होता. परंतु अखेर ढवळीकर यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी असलेले निकटचे संबंध तसेच भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द या बळावर ढवळीकर यांनी वीज खाते मिळवले.
ढवळीकर यांना वीज खात्याबरोबरच अपारंपरिक ऊर्जा तसेच गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे. नीळकंठ हळर्णकरना मच्छिमारी, पशुसंवर्धन आणि कारखाने व बाष्पक ही खाती देण्यात आली आहेत तर सुभाष फळदेसाई यांना समाजकल्याण, नदी परिवहन आणि पुरातत्त्व पुराभिलेख ही खाती देण्यात आलेली आहेत.
महामंडळांचेही वाटप
दरम्यान, महामंडळाचे वाटपही मुख्यमंत्री सावंत यांनी केले असून अपक्ष आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांना औद्योगिक विकास महामंडळ, जीत आरोलकर यांना गृहनिर्माण मंडळ, गणेश गावकर यांना पर्यटन विकास महामंडळ तर दिव्या राणे यांना वन विकास महामंडळ देण्यात आलेले आहे. उत्तर गोवा नगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद जेनिफर मोन्सेरात तर दक्षिण गोवा नगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद दाजी साळकर यांना दिलेले आहे.