लोकमत न्यूज नेटवर्क सांगे: शेळपे सांगे येथील वरुण ब्रेव्हेरीजच्या कामगारांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी गेल्या २२ दिवसांपासून संपावर असलेल्या कामगारांनी काल शुक्रवारी सांगे शहरात घोषणाबाजी करत निषेध मोर्चा काढला व दांडो येथे समारोप करून परत कंपनी गेटबाहेर धरणे धरले.
गेल्या चार वर्षांपासून कंपनीकडून कामगारांसाठी पगारवाढ करण्यात आलेली नाही. ती व्हावी म्हणून विविध स्तरातून प्रयत्न करण्यात आले. पण, कोणतेही यश हाती लागत नसल्याचे आढळून आल्यानंतर कामगारांनी सांगेमध्ये न्याय देण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला. यावेळी कामगारांपेक्षा पोलिस फौज संख्या अधिक असल्याचे दिसून आले.
कामगार महेश बोरकर म्हणाले, कंपनी आज नाही तर उद्या आमच्या मागण्या पूर्ण करेल, म्हणून आम्ही विश्वास ठेवून होतो. आज चार वर्षे पगारात एक पैसाही वाढवला जात नाही. कामगार आयुक्तांपर्यंत न्याय मागण्यात आला. पण, अद्याप काहीच न्याय मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. कंपनी न्याय देणार म्हणून आम्ही गप्प राहिलो. पण, कंपनी अधिकारी कामगार वर्गाच्या मागण्यांकडे लक्ष देण्याशिवाय आपल्या मर्जीतील पर राज्यातील कामगार भरती करण्यात गुंतलेले आहेत. स्थानिक आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळ देसाई यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे नीलेश भंडारी यांनी आभार मानले.
कामगार म्हणतात, आम्हाला स्थानिक आमदारांनी खूप मदत केली, सहकार्य केले. अन् दुसऱ्या बाजूने तेच कामगार गेल्या बावीस दिवसांपासून गेटवर बसून असल्याची खंत व्यक्त करत होते.
नियमांची पडताळणी गरजेची
मिमीन फर्नाडिस म्हणाले, सरकार जॉब फेअर म्हणून मोठ्या जाहिराती करून बेकार युवकांना मोठ्या कंपनीत भरती करतात. मात्र, त्यानंतर या कंपन्या आपल्या निय- मानुसार वागतात की नाही, याची पडताळणी कोणी पाहावी. कामगार वर्गाला असा वाईट अनुभव आल्यास राज्यात खासगी नोकरभरतीवर कोणी लक्ष देणार नाही अन् विश्वास ठेवणार नाही.