लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मान्सूनच्या तोंडावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपत्कालीन व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेतला. नैसर्गिक समस्यांना सामोरे जाण्यास राज्य आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच आपत्ती काळात अलर्ट मिळविण्यासाठी भारतीय हवामान खात्याचे जारी केलेले 'सचेत' मोबाइल अॅप मोबाइलवर डाउनलोड करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, ४०० आपदा मित्रांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आपत्कालीन यंत्रणेला धोकादायक ठरणारी झाडे कापण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी याबाबत विशेष खबरदारी घेणार आहेत. अग्निशमन दलानेही सर्व प्रकारची सज्जता ठेवली आहे. सध्या कालवे, तळी आणि धबधब्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रकार घडू लागल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. असे प्रकार होऊ खबरदारीचे घेण्यासाठी जिल्हा यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. धोकादायक ठिकाणी सूचना लिहिलेले फलक लावण्यात येणार आहेत. लोकांनीही चिरेखाणी, धबधबे, नद्या या ठिकाणी गेल्यास त्यात पोहायला उतरू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
आपत्कालीन व्यवस्थेत दिलासा देण्यासाठी राज्यात ११ ठिकाणी निवारा घरेही उभारण्यात आली आहेत. गरज पडलीच तर अशा ठिकाणी सर्वांना हलविण्याची यंत्रणा सज्ज आहे, असे त्यांनी सांगितले. यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यासाठी नौदल व इतर एजन्सीकडूनही मदत घेण्यात आली आहे.
दरड कोसळणे आणि भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या जागाही अधोरेखित करण्यात आल्या आहेत आणि त्या ठिकाणी काय खबरदारी घ्यावी, याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
'स्मार्ट सीटी'ची उर्वरीत कामे लवकरच पूर्ण होतील: सावंत
पणजी शहरातील स्मार्ट सीटी योजनेचे ९५ टक्के काम पूर्ण होत आल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. उर्वरित कामही लवकर पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी पणजी स्मार्ट सीटी योजनेचे कामही पूर्ण होत आल्याचे सांगितले. याबाबत स्मार्ट सीटी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजित रॉड्रिग्स योग्य माहिती देऊ शकतील, असे ते म्हणाले. स्मार्ट सीटीची सर्व कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करणार असल्याचे निवेदन इमेजिन पणजी स्मार्ट सीटी लि., पणजी महापालिका आणि कंत्राटदाराने न्यायालयात दिली होती.