सद्गुरू पाटील ल्ल पणजी राज्याचा अर्थसंकल्प तयार करण्याबाबतची तयारी सध्या प्रचंड वेगात सुरू आहे. आपण दिवसभर अर्थसंकल्पविषयक बैठकांमध्येच सध्या भाग घेतो. यावेळचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे रोजगारनिर्मितीवरच भर देणारा असेल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी खास ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पार्सेकर यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर येत्या महिन्यात ते अर्थमंत्री या नात्याने आपला पहिलाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर यावेळच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये विचारली असता, मुख्यमंत्री म्हणाले की, रोजगारनिर्मिती हे आपले मुख्य ध्येय आहे. त्याच ध्येयाचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात पडलेले पाहायला मिळेल. कल्याणकारी योजना आतापर्यंत अनेक आल्या, त्यामुळे आपल्या अर्थसंकल्पात नव्या कल्याणकारी योजनांपेक्षा रोजगारनिर्मितीस प्राधान्य असेल. अधिकाधिक उद्योग गोव्यात यावेत. जेणेकरून रोजगार संधी निर्माण होतील व गोव्यातील सुशिक्षित युवक-युवतींना त्या रोजगाराचा लाभ मिळेल, असे मला वाटते. त्याचदृष्टीने अर्थसंकल्पात तरतुदी असतील. शेती व अन्य क्षेत्रांतही अधिक रोजगाराची निर्मिती व्हायला हवी. आयटी, फार्मास्युटिकल्स व अन्य उद्योग गोव्यात यायला हवेत. ज्या उद्योगांमुळे प्रदूषण होणार नाही, असे प्रकल्प उभे राहिले, तर गोमंतकीयांसाठी रोजगाराच्या संधी तयार होतील. तुये येथे इलेक्ट्रॉनिक सिटी उभारणे किंवा चिंबल येथे आयटी हॅबिटेट उभे करणे हे प्रस्ताव आम्ही रोजगारनिर्मितीच्या हेतूनेच आणले आहेत. अर्थसंकल्पातून अशा प्रकारच्या प्रयत्नांना चालना दिली जाईल, असे पार्सेकर म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्याने उद्योगांसाठी स्वत:चे गुंतवणूक धोरण आणले. त्यानंतर गुंतवणूक मंडळही स्थापन केले. या मंडळाने आतापर्यंत काही उद्योगांना मंजुरी दिली. काही हजार नोकऱ्या त्यातून तयार होतील. गुंतवणूक धोरण हे उपयुक्त ठरले आहे. अर्थसंकल्पात साधनसुविधा निर्माण, कृषी विकास यापेक्षाही रोजगारनिर्मितीवर अधिक भर द्यावा, असे मला वाटते.
रोजगारनिर्मितीवरच भर!
By admin | Published: February 24, 2015 3:00 AM