लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील फिट इंडिया उपक्रमांतर्गत राज्यातील जनतेचे आरोग्य २०२४ या नवीन वर्षात उत्तम राहावे, यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल. स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर गोवा योजनेंतर्गत कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करून वर्षभरात मोठा टप्पा गाठणे, हा आपला संकल्प आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'फिट इंडिया' अंतर्गत राज्यातील बालक, युवा, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विविध उपक्रम हाती घेणे, क्रीडा, योग, प्राणायाम, आयुर्वेदासह इतर माध्यमातून जागृती करताना प्रत्येक घराचे आरोग्य उत्तम कसे राखता येईल, यासाठी आमचे प्रयत्न असतील. आम्ही स्वयंपूर्ण गोवाचा नारा दिला. त्याला राज्यातील जनतेने मोठा प्रतिसाद दिला आहे. यापुढेही कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करताना विविध क्षेत्रांत प्रशिक्षण देणे, प्रत्येक हाताला काम देणे हा संकल्प केला आहे. महिला, शेतकरी आदी घटकांवर भर देताना प्रत्येक क्षेत्रात नावीन्यपूर्ण कौशल्य विकसित करणारे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.'
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'केंद्र व राज्याच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक घरात मिळावा यासाठी संघटित प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री म्हणून काम करताना सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. २०२३ मध्ये विकासाच्या अनेक योजनांना आम्ही चालना देऊ शकलो, अनेक प्रलंबित विषय मोकळे केले याचे निश्चित समाधान वाटते. राज्यात अनेक नवे प्रकल्प, उद्योग व क्रांती घडवणारे उपक्रम राबवण्याचा आमचा दृढ निर्धार आहे.'