मडगाव: घोड्यासारखा तोंडावळा असल्याने ‘पाणघोडा’ म्हणून ओळखल्या जाणा-या आणि लहान मुलांमध्ये ‘सीहॉर्स’ म्हणून प्रचलित असलेल्या सागरातील अनोख्या अशा माशाचे जीवनमान धोक्यात आलेले असून पारंपारिक औषधासाठी असलेली मागणी तसेच एक्वेरियममध्ये ठेवण्यासाठी होत असलेली मागणी त्याच्या जीवावर उठली असून अशातच या माशाचे अधिवास क्षेत्रही बिघडले जात असून त्यामुळे सागरातील ही प्रजातीच संपुष्टात येण्याची भीती गोव्यातील सागर विज्ञान केंद्रातील संशोधकांनी व्यक्त केली आहे.
जगभरात पाणघोड्याच्या सुमारे 41 जाती सापडत असून त्यापैकी दहा जाती भारतीय सागरी क्षेत्रात सापडतात. ‘सिग्नाथीड’ या कुटुंबातील असलेल्या पाणघोड्याची खासियत म्हणजे त्यातील नर मासा अंडी उबवत असतात. ही प्रजाती संरक्षित एक अधिसूचीत समाविष्ट झालेली असून त्याचा व्यापार किंवा पालन कायद्याने बंदीकारक आहे.
असे असतानाही चीन आणि अन्य भागात या प्रजातीचा पारंपारिक औषधासाठी वापर केला जात असल्याने त्याची मोठ्या प्रमाणावर शिकार होत असते. या शिवाय एक्वेरियमची शोभा वाढविण्यासाठीही त्यांना पकडण्यात येते. याशिवाय त्यांचे अधिवास क्षेत्रेही अर्निबधीत मासेमारीमुळे विस्कळीत होत चालली असून त्यामुळेच त्यांची संख्या झपाटय़ाने कमी होत असल्याचे दिसून आले आहे असे सागर विज्ञान केंद्राच्या मुख्य संशोधक आर.ए. श्रीपदा यांनी सांगितले.
गोव्यात या पाणघोड्यांची व्यापारासाठी शिकार केली जात नसली तरी कित्येकदा ते मासेमा-यांच्या जाळ्यात सापडतात. त्यांच्या अनोख्या आकारामुळे मासेमारी त्यांना परत पाण्यात सोडण्याऐवजी आपल्या घरी नेणे पसंत करतात. कित्येकवेळा मासेमा-यांच्या जाळ्यांनी त्यांची अधिवास क्षेत्रे विस्कळीत होतात. एवढेच नव्हे तर कित्येकवेळा समुद्रात सोडल्या गेलेल्या गोड्या पाण्यामुळेही त्यांचा जीव धोक्यात आल्याचे श्रीपदा यांनी सांगितले.
मागची काही वर्षे गोव्यातील सागर विज्ञान केंद्राने या पाणबुडय़ांचे संवर्धन हाती घेतले असून गोवा आणि महाराष्ट्रात हे पाणघोडे सापडले आहेत. सध्या पडत असलेल्या पावसाने खवळलेल्या दर्यामुळेही या पाणबुडय़ांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यांच्या संवर्धनासाठी विशेष लक्ष देण्याची गरज संशोधक व्यक्त करीत आहेत.