राजधानी पणजीत सकाळ-संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंडी होते. विशेषतः शहरात लोकोत्सव, फिश फेस्टिव्हल किंवा कार्निव्हलसारखे सोहळे होतात, तेव्हा हजारो लोकांचा व पर्यटकांचाही जीव गुदमरतो. वाहतूक व्यवस्था कोलमडते. मात्र, सरकारला याचे काही सोयरसुतक नाही. कार्निव्हल, लोकोत्सव, फिश फेस्टिव्हल अशा सोहळ्यांसाठी सरकारी पैसा शक्य तेवढ़चा लवकर खर्च करून मोकळे व्हायचे असे काही जणांनी ठरवून टाकलेले असते.
गेल्या आठवड्यात पणजीत एवढी वाहतूक कोंडी झाली की, लोकांनी सरकारच्या नावे बोटे मोडली. अगोदरच लाखो पर्यटक आलेले आहेत. पर्यटकांची वाहने पणजीत फिरतात. सरकारी कर्मचारी, खासगी कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक हे सगळे प्रवास करतात. वाहने अडकून पडल्यानंतर सर्वांचीच कामे खोळंबतात. प्रत्येकाला त्रास होतो. सगळे शहर खोदून ठेवले असताना तरी पणजीत सोहळ्यांचे आयोजन करायला नको, असे सरकारला वाटायला हवे. एकाचवेळी कला अकादमी कांपाल परिसरात लोकोत्सव व फिश फेस्टिव्हलला मान्यता देणारे सरकार पूर्णतः असंवेदनशील झाले आहे काय? सरकारची बुद्धी जर ठीक असती तर पणजीत अधिकाधिक वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून वाहतुकीचे व्यवस्थापन करता आले असते.
भाजपने 'गांव चलो अभियान' मोहीम रविवारी जोरात राबवली. आता गांव चलो वगैरे पुरे झाले, त्यापेक्षा सर्व मंत्र्यांना सोबत घेऊन स्मार्ट सिटीत एखादे अभियान राबवावे आणि पणजीतील लोक, वाहन चालक, दुकानदार यांचे दुःख समजून घ्यावे. गांव चलो अभियानावेळी मंत्री बाबूश मोन्सेरात नावापुरते पणजीत काही ठिकाणी फिरले, जिथे रस्ते पूर्ण फोडून ठेवले आहेत, जिथे वाहन नेताच येत नाही व धुळीचे साम्राज्य आहे तिथे ते फिरकलेच नसावेत, तसे पाहायला गेल्यास अनेक मंत्री केवळ फोटोपुरते फिरतात. भाजपचा कार्यक्रम आपण केला, फोटो काढून हायकमांडला पाठवला एवढेच समाधान काही आमदार व मंत्र्यांना मिळत असते. अवधेच मंत्री भाजपचे सगळे कार्यक्रम व बैठका गंभीरपणे करत असतात.
राजधानी पणजीत दुकानदारांचा व्यवसाय थंडावला आहे. फार्मसीत औषधे आणायला जायचे झाले तर वाट सापडत नाही. सांतड़नेजला स्मशानभूमीत कुणाचा मृतदेह न्यायचा झाला तर रस्ता शिल्लक नाही. मोठी कसरत करून कसेबसे लोक स्मशानभूमीपर्यंत पोहोचतात. अर्थात पणजीत कामे व्हायलाच हवीत, रस्ते ठीक व्हायलाच हवेत, सांडपाणी निचरा व्यवस्था किंवा गटारे ठीक व्हायलाच हवीत, त्यामुळे कळ सोसावी लागेल, पण गेली काही वर्षे फक्त खोदाईच चालली आहे. एक रस्ता दुरुस्त करून मग दुसरा फोडावा, पण तसे होत नाही.
सगळे रस्ते एकाचवेळी फोडले आहेत. कुठून कुठे वाहन न्यावे हे सांगण्यासाठी फोडलेल्या रस्त्यावर कुणीच असत नाही. सांतड़नेज, भाटलेपासून कांपाल ते पणजी मार्केट परिसर व अठरा जून रस्ता अशा सगळ्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, तरीही पुरेशा संख्येने वाहतूक पोलिस नियुक्त केले जात नाहीत, फक्त राज्यपाल श्री पिल्लई व मुख्यमंत्री सावंत किंवा कुणी केंद्रीय मंत्री पणजीतून जात असतील तरच वाहतूक पोलिसांना उभे केले जाते. हजारो वाहनधारक रोज बिचारे पणजीत वाहने चालवायला कंटाळतात. लोक शहरात येऊ पाहत नाहीत.
कसिनो व्यावसायिक आणि त्यांचे ग्राहक यांची शेकडो वाहने पणजीत मुख्य रस्त्यावर फिरतात. जुन्या सचिवालयाच्या मागून जाणाऱ्या रस्त्यावर कोंडी होते. कसिनोंवरील ग्राहकांची वाहने सगळीकडे पार्क केलेली असतात. रस्त्यांवरील एकूण वाहतूक कोंडीत हे कसिनो खूप भर टाकतात. स्मार्ट सिटीचे सगळे काम पूर्ण होईपर्यंत पणजीत मोठे सोहळे आयोजित करण्यास मुख्यमंत्र्यांनी तरी मंजुरी देऊ नये. पणजीतील वाहनधारकांचे हाल होत आहेत. पणजीत खड्ड्यात पडून आतापर्यंत दोघांचा जीव गेलाच आहे. एका माजी नगरसेवकाचा कोवळा मुलगा ठार झाला. मळा भागात गेल्याच आठवड्यात एक ६५ वर्षीय नागरिक गटारात पडून मरण पावला. स्मार्ट सिटीच्या कामांतील गलथानपणा हा पणजीसाठी शाप ठरलाय.