नारायण गावस, पणजी गोवा: गोव्यातील खाजन जमिनींचे संर्वधन गरजेचे असून या खाजन जमिनीवर माेठ्या प्रमाणात जैवविविधता असते. गाेव्यातील खाजन जमिनींमध्ये झपाट्याने हाेत असलेले कॉक्रेटीकरण हे भविष्यासाठी धाेकादायक आहे. यासाठी खाजन जमिनीसाठी सर्वंनी पुढाकार घ्यावा, असे मत समाज कार्यकर्ते तसेच पर्यावरण अभ्यासकांनी मांडले. शनिवारी पणजीत इ्न्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझा सभग्रहात आयाेजित केलेल्या खांवटे या लघुपटाच्या परिसंवादात ते बोलत होते.
गोवा खाजन साेसायटीतर्फे आयोजित केेलेल्या या परिसंवादात गोवा फाऊंडेशनचे संस्थापक क्लॉड अल्वारिस, प्रा. रामाराव वाघ, गोवा जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम, ज्येष्ट पत्रकार पॉवल फर्नाडिस, खाजन सोसायटी गोवाच्या अध्यक्षा एल्सा फर्नाडीस व खांवटे लघुपट निर्माते कबीर नाईक यांची उपस्थिती होती.
- एग्रीकल्चर टेनन्सी ॲक्टनुसार गाेव्यातील खाजन जमिनीत कॉक्रेटीकरण करता येत नाही. पण गोव्यात मागील काही वर्षापासून शेती जमिनीत बांधकाम सुरु केले. या जामिनी बिल्डरांकडून विकत घेतल्या जात आहे. मोठ्या प्रकल्पामुळे या खाजन जमिनी नष्ट होत चालल्या आहे. खारफुटी तसेच इतर जैवविविधता नष्ट होत चालली आहे हे धोकादायक आहे, असे पर्यावरण प्रेमी क्लॉड अल्वारिस यांनी सांगितले.
- राज्यात अनेक ठिकाणी सीआरझेडचे उल्लघंन करुन बांधकाम केले जात आहे. खारफुटीची झाडे कापून त्या ठिकाणी बांधकाम सुरु आहे. आम्ही गेली अनेक वर्षे या विरोधात लढा देत आहोत. या खाजन जमिनीमध्ये डंप केले जात आहे. सरकारच्या सर्व खात्यांना या विषयी निवेदने दिली तरी कुणाकडूनची याची याेग्य दखल घेतली जात नाही. या खाजन शेतजमिनीमध्ये बांधकाम करण्यासाठी बेकायदेशीर सर्व परवानग्या बिल्डरांना दिल्या जात आहे, असे प्रा. रामराव वाघ यांनी सांगितले.
- खाजन जमिनी नष्ट झाल्यावर त्याचे परिणाम म्हणून राज्यात पूर येत आहे. तसेच जैवविविधता नष्ट होणार आहे. सध्या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी खाजन जमिनींचा बळी दिला जातो. विकासाच्या नावाखाली या पारंपरिक खाजन जमिनी कमी होत गेल्या, असे जेष्ट पत्रकार पॉवल फर्नाडिस यांनी सांगितले.
-राज्यातील खाजन जमिनींचे संवर्धनासाठी गोवा जैवविविधता मंडळाची जैवविविधता सदस्य मंडळे राज्यभर काम करत आहे. प्रत्येक गावामध्ये या सदस्य मंडळ आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांच्याकडून काम केले जात आहे, असे जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम यांनी सांगितले.