दाबोळी विमानतळ चालू राहण्याची खात्री द्या: खासदार विरियातो फर्नांडिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2024 01:25 PM2024-07-28T13:25:22+5:302024-07-28T13:26:09+5:30
अधिवेशनात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: दाबोळी विमानतळ बंद पाडण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न चालू असल्याची आम्हाला शंका आहे. या विमानतळाबाबत दक्षिण गोव्यातील नागरिकांना मोठी चिंता निर्माण झाली आहे. दक्षिण गोव्याची संपूर्ण अर्थव्यवस्था दाबोळी विमानतळावर अवलंबून आहे. दाबोळी विमानतळ कायमस्वरूपी चालू राहणार याची खात्री द्या, अशी मागणी दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नाडिस यांनी केली आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजारापू राममोहन नायडू यांना: यांना उद्देशन लोकसभा अधिवेशनावेळी ते बोलत होते. खासदार फर्नांडिस यांनी नुकतेच लोकसभा अधिवेशनात दाबोळी विमानतळविषयी प्रश्न उपस्थित केला. हे विमानतळ बंद करण्याचा प्रयत्न चालू असल्याचा संशय आम्हा दक्षिण गोव्यातील लोकांना आहे. २०२३-२४ या कालावधीत दाबोळी विमानतळावर ६८ लाख ५५ हजार प्रवासी हाताळण्यात आले असून नव्याने बांधलेल्या मोपा विमानतळावर ४४ लाख ३८ हजार प्रवाशी हाताळल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दाबोळी विमानतळ आणि मोपा विमानतळावरून हाताळण्यात येणाऱ्या प्रवासी विमानसेवेच्या किमतीत फरक असल्याचे दिसून येते. तो फरक 'युर्सर डेव्हलोप्मेण्ट फी' मुळे असल्याचे फर्नांडीस यांनी सांगितले. हल्लीच दाबोळी विमानतळावरील स्पाईस जेट, ओमान एअरवेझ, कतार एअरवेझ, तूय एअरवेझ आणि नुकतेच एअर अरेबिया विमानसेवा कंपन्यांनी त्यांची दाबोळी विमानतळावरील विमानसेवा उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावर नेल्याचे फर्नांडीस यांनी लोकसभेत सांगितले.
दाबोळी विमानतळावरून विमानसेवा देणाऱ्या कंपन्या मोपा विमानतळावर नेत असल्याने दाबोळी विमानतळावर मोठा परिणाम होणार आहे. दाबोळी विमानतळ फक्त विमानतळ नसून दक्षिण गोव्याची अर्थव्यवस्था या विमानतळावर अवलंबून आहे. दाबोळी विमानतळावर येणाऱ्या लाखो पर्यटकांमुळे येथील हॉटेल, शेंक, टॅक्सी आणि अन्य विविध व्यवसाय अवलंबून आहेत. त्यामुळे लाखो लोकांच्या रोजगाराच्या हितासाठी दाबोळी विमानतळ कायमस्वरूपी चालू राहणार याची खात्री करून घ्या, अशी मागणी फर्नाडिस यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्र्यांकडे केली.