पणजीः जुने गोवे येथील वारसा स्थळापासून १०० मीटर अंतरावर कोणत्याही प्रकारची उल्लंघने होणार नाहीत याची खबरदारी घेतली जाणार असल्याचे आश्वासन उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत दिले.
आमदार एल्टन डिसोझा यांनी हा मुद्दा विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केला होता. ते म्हणाले की गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ गुंतवणूकदारांनी आकर्षित करण्यासाठी जमिनी देताना संबंधित जमिनीच्या बाबतीत अभ्यास करीत नाही. कोणत्या प्रकारच्या जमिनी आहेत, त्या ओलिताखालील आहेत, खाजन आहेत की आरक्षित आहेत हे न पाहता त्या जमीनी गुंतवणूकदारांना देत आहेत असा दावा त्यांनी केला. तसेच जुने गोवे येथील वारसास्थळाजवळच्या आरक्षित जागेपासून १०० मीटर अंतरावर एक हॉटेल प्रकल्प येत असल्याची भिती लोक व्यक्त करीत असून मंत्र्यांनी या संदर्भात विधानसभेत स्पष्ट आश्वासन द्यावे की तसा कोणताही प्रकल्प होऊ दिला जाणार नाही.
उद्योगमंत्री गुदिन्हो यांनी वारसास्थळापासून १०० मीटर अंतरावर कोणताही प्रकल्प होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार असल्याचे सांगितले. परंतु गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ निर्बंधांखालील आणि आरक्षित जमीन गुंतवणूक दीरांना देत असल्याचा डिकॉस्टा यांचा दावा त्यांनी फेटाळला. ते म्हणाले की कोणतीही आरक्षित किंवा निर्बंध असलेली जमीन गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने गुंतवणूकदारांना दिलेली नाही. इतकेच काय तर तशी जमीन संपादितही करण्यात आलेली नाही. एखाद्या निर्बंध नसलेल्या मोठ्या जमिनीचा एक छोटासा भाग जर ओलिताखालील असेल तर ती संपूर्ण जमीन ओलिताखालील जमीन ठरत नाही. तसेच तेवढा भाग वगळून ती जमीन संपादीत करता येत नाही असे त्यांनी सांगितले.