- समीर नाईक पणजी - गोवा विद्यापीठातर्फे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) सहकार्याने २२ व्या राष्ट्रीय अंतराळ विज्ञान परिसंवादाचे आयोजन केले होते. सदर परिसंवाद नुकताच गोवा विद्यापीठात पार पडला. सलग पाच दिवस चाललेल्या या कार्यक्रमाला देशभरातील विविध शास्त्रज्ञांनी उपस्थित लावली होती.
पाच दिवसीय परिसंवादाचा समारोप समारंभ आणि पुरस्कार समारंभाने झाला. यावेळी भारतीय हवामानशास्त्र संस्था, पुणेचे प्रो. आर. कृष्णन, भौतिक संशोधन प्रयोगशाळा, अहमदाबादचे संचालक प्रा.अनिल भारद्वाज, अंतराळ भौतिकशास्त्र प्रयोगशाळा व्हीएसएसस, त्रिवेंद्रमचे संचालक डॉ. के. राजीव, इस्रो अंतराळ विज्ञान कार्यक्रम, संचालक डॉ. टी. पी. दास यांसारख्या अंतराळ तज्ञांचा समावेश होता. कुलगुरु तथा राष्ट्रीय आयोजन समितीचे सदस्य प्रा. हरिलाल मेनन, गोवा विद्यापीठाचे प्रो. सी. यू. रिवोणकर, प्रा. विष्णू नाडकर्णी, व प्रा. कौस्तुभ प्रियोळकर यांची यावेळी उपस्थिती होती.
परिसंवादाने सर्व सहभागींना प्रभावीपणे गुंतवून ठेवल्याबद्दल समाधान वाटत आहे. गोवा विद्यापीठाच्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले आहे. या परिसंवादाचा संपूर्ण अहवाल इस्रोला सादर केला जाईल आणि विविध सत्रांदरम्यान तयार केलेले प्रस्ताव पुढील प्रगतीसाठी रोडमॅप म्हणून घेतले जातील, असे डॉ. टी. पी. दास यांनी यावेळी सांगितले.
डॉ. के. राजीव यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले आणि यशस्वी परिसंवाद आयोजित करण्यासाठी स्थानिक आयोजन समितीचे अभिनंदन केले. त्यांनी या परिषदेत अंतराळ संशोधनात गुंतलेली प्राथमिक एजन्सी म्हणून इस्रोला सहाय्य करणाऱ्या अंतराळ अभियंत्यांचा समावेश केला आहे. परिसंवादाचा आंतरशाखीय दृष्टीकोन, संशोधन कल्पना व विद्यार्थ्यांचा सहभाग, सादरीकरणास प्रोत्साहन द्या, अशी सूचना त्यांनी केली.
दरम्यान, प्रा. रिवोणकर यांनी अवकाश विज्ञान व्यावसायिक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचे यावेळी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक लॉरेन अल्बर्टो व आणि रुना मिनेझिस यांनी केले. तर विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. व्ही. एस. नाडकर्णी यांनी आभार व्यक्त केले.