पणजी: राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या सहकार्याने रविवारी राष्ट्रीय रेड रन २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. बांबोळी येथील ॲथलेटीक्स स्टेडीयमवरुन या मॅराथोनला सुरुवात झाली.
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या संचालक निधि केसरवानी यांनी झेंडा दाखवून या मॅराथोनला सकाळी ७ वा. सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त सचिव व्ही. हेकाली झिमोमी, आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालिका डॉ. गीता काकोडकर, गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे संचालक डॉ. गोकुळदास सावंत, सह संचालक डॉ. उमाकांत सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील, इतर विविध राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे १५७ पेक्षा जास्त स्पर्धकांनी या मॅराथोनमध्ये भाग घेत राज्यात एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती केली. बक्षिस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते, तर त्यांच्यासाेबत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे देखील उपस्थित होते.
निरोगी शरीरात निरोगी मन असते आणि निरोगी समाज तसेच प्रगतीशील राष्ट्र निर्माण करण्यासाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. एक काळ होता जेव्हा जग एड्सच्या रुग्णांना तुच्छतेने पाहत असे आणि त्यांना एकटे पाडायचे, अपमानित करायचे, पण आता तशी परिस्थीती राहीलेली नाही. आता एड्सबाबत बऱ्यापैकी जागृती झाली असून, याचे श्रेय एड्स नियंत्रण संस्थेंना जातेे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच एड्सग्रस्त व्यक्तींविरुद्ध कोणतेही गैरवर्तन किंवा पक्षपात होत असल्यास त्याची तक्रार करण्यासाठी १०९७ हेल्पलाईनचा वापर करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी केले.
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने हॉटेल, रेस्टॉरंट आणि किनारी भागात डिस्पेंसरद्वारे सुरक्षा उपाय उपलब्ध करून देणारी मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत. एड्सबाबत साथीदारांचा दबाव धोकादायक ठरत आहे. अशा प्रकारच्या दडपणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालकांनी मुलांना मदत करावी आणि तरुण पिढीला अशा धोकादायक गोष्टींपासून दूर ठेवावे. संस्थेने शाळांवर भर देत जास्त जागृती करावी, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.