लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेतून गोवा राज्य उभारी घेत आहे. गोवाभरातून मोठ्या संख्येने महिला, पुरुष स्वतःचा उद्योग, धंदा पुढे नेत आहेत. प्रत्येक घरात एक उद्योग व एक उद्योजक तयार करण्याचा आमचा संकल्प आहे. लोकांनी स्वतः पुढे यायला हवे. आपण तयार करीत असलेल्या मालाला अन्न सुरक्षा प्रमाणपत्र असावे व योग्य आकर्षक पॅकिंग असावे, यासाठी सरकारकडून राज्यभरातील महिलांना प्रशिक्षित करण्यात येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीत केले.
काही उत्पादने बाहेरून आणून त्याला गोव्याचे उत्पादन, असे भासवून ग्राहकांची फसवणूक होत आहे. त्याची चौकशी करून असे प्रकार बंद करण्यासाठी आपण खात्याला सूचना केल्या आहेत, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या कायदा मोजमाप खात्यातर्फे गोवा राज्य ग्राहक हक्क दिनानिमित्त स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास मंडळ, नियोजन, संख्यांकन व मोजमाप खाते, अन्न व औषध संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने पॅकर्स प्रमाणपत्र व अन्न सुरक्षा परवाना प्रदान करण्यासाठी प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम आयोजित केला होता. व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, नगराध्यक्षा रश्मी देसाई, कायदा मोजमाप खात्याचे सचिव संजित रॉड्रिगीस, नियोजन, संख्यांकन व मोजमापन खात्याचे संचालक विजय सक्सेना, ग्रामीण विकास मंडळाचे संचालक गोपाळ पार्सेकर, अरुण पंचवाडकर, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी दीपाली नाईक, संज्योत कुडाळकर, गौतम खरंगटे, संगम पाटील आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमात पॅकर्स प्रमाणपत्र तसेच अन्न सुरक्षा परवाना मिळालेल्या महिलांना प्रमाणपत्रे व परवाने मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्वयंसाहाय्य गटांच्या परवाना व प्रमाणपत्र शुल्काचा भार उचललेल्या इंधन डिलर्सचा हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रंजना मळीक यांनी केले, आभार अरुण पंचवाडकर यांनी मानले.
गोमंतकीयांनी अग्रेसर राहावे
स्वयंपूर्ण गोवाच्या पहिल्या टप्प्यात सर्व पंचायतींमध्ये येणाऱ्या स्वयंपूर्ण मित्रांकडून गावातील विविध समस्यांवर लक्ष वेधून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. आता दुसऱ्या टप्प्यात खऱ्या अर्थाने लोकांना स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्व खात्यांना सक्रिय बनविण्यात आले आहे. स्वयंसाहाय्य गट, महिला मंडळे तसेच स्वतःहून विविध प्रकारचे पदार्थ बनविणाऱ्या लहान सहान व्यावसायिकांना त्यांचे उत्पादन विक्रीसाठी योग्य व्यासपीठ मिळावे. त्याला बाजारपेठ मिळावी. त्यांच्या उत्पादनाचा दर्जा वाढावा यासाठी अन्न सुरक्षा परवाना तर उत्पादनातील आकर्षकता वाढविण्यासाठी दर्जेदार पॅकिंग व्हावे, यासाठी पॅकर्स प्रमाणपत्र दिले जात आहे. याचा लाभ घेत आपल्या उत्पादनांना सरकारच्या सहकार्याने चांगली बाजारपेठ मिळविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.