निवृत्ती शिरोडकर ल्ल पेडणे सरकारला शापोरा नदीत कॅसिनो स्थलांतरित करण्यासाठी अरबी समुद्र आणि शापोरा नदीचे मीलन होते त्या तेंबवाडा-मोरजी येथे मोठ्या प्रमाणात असलेला सॅण्ड बार वाळूचा पट्टा पूर्ण काढावा लागेल. त्यामुळे पूर्ण तेंबवाडा परिसराला धोका निर्माण होणार आहे. शापोरा नदीकिनारी बार्देसच्या बाजूने कायसूव, शापोरा, गुडे, शिवोली, कामुर्ली, कोलवाळ, रेवोडा, साळ हे भाग येतात, तर पेडणे तालुक्यातील मोरजी, चोपडे, आगरवाडा, वायडोंगर-पार्से, आरोबा, धारगळ, वझरी, इब्रामपूर, हळर्ण-तळर्ण हे भाग येतात. या शापोरा नदीत मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने मासेमारी, खुबे, तिसरे, शिणाणे, कालवा काढली जातात. त्याशिवाय आगखाण येथील मिठागरेही याच शापोरा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. हे सर्व व्यवसाय धोक्यात येणार आहेत. पर्यटन व्यवसाय धोक्यात मोरजी किनारी भागातील स्थानिकांचे जीवन आता पूर्णपणे पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. येथील स्थानिक व्यावसायिक पर्यावरणाचे जतन करून पर्यटन हंगामात पर्यटन व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवत असतात. तोही व्यवसाय धोक्यात येणार आहे. कॅसिनोतील टाकाऊ इंधन, आॅईल, जनरेटरला लागणारे डिझेल व कॅसिनोमध्ये येणाऱ्या प्रत्येक मनुष्यगणाची दैनंदिन नैसर्गिक विधीची घाण, विष्टा, कचरा याच शापोरा नदीत फेकून जलप्रदूषण होणार आहे. नदी प्रदूषित होईल नदी, ओढे, तलाव, नाले यामध्ये माणूस इतकी घाण टाकतो की, पाणी शुद्ध न राहता ते मोठ्या प्रमाणात प्रदूषित होते. अनेक नाले, गटारे नदीला मिळतात. गटार-नाल्यातून वाहणारे घाण पाणी नदीच्या पाण्यात मिसळते. पाण्यात मिसळणाऱ्या अनेक अपायकारक घटकांमुळे पाणी अशुद्ध बनते.
पर्यावरण, पर्यटनावर गंभीर परिणाम
By admin | Published: August 29, 2015 2:46 AM