पणजी : सरकारी आरोग्य विमा योजनेच्या (डीडीएसव्हाय) अंमलबजावणीत त्रुटी आहेत. या योजनेखाली ज्या कार्डाचे लोकांनी नूतनीकरण करून घेतले आहे, ते कार्ड काही इस्पितळांमध्ये स्वीकारलेच जात नाही, असे विरोधी आमदारांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले व नाराजी व्यक्त केली. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी योजनेत सुधारणा करून उपाय काढण्याची ग्वाही दिली.
प्रश्नोत्तराच्या तासावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेसचे आमदार रवी नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मूळ प्रश्न रवी नाईक यांनी मांडला होता. डीडीएसव्हाय योजनेंतर्गत सरकारने 84 कोटी रुपये खासगी इस्पितळांना दिले. 103 कोटी रुपये विमा कंपनीला दिले. विमा कंपनीने तेरा कोटींचा नफा मिळविला. ही योजना म्हणजे कुणाला नफा मिळविण्यासाठीचा धंदा नव्हे, असे नाईक म्हणाले. लोकांच्या कार्डाचे नूतनीकरण थांबलेले आहे, ते पुन्हा सुरू करणार की नाही अशी विचारणा नाईक यांनी केली.
आपल्या बाणावली मतदारसंघातील एका इसमाने डीडीएसव्हाय योजनेंतर्गत कार्डाचे नूतनीकरण करून घेतले व दुस-याच दिवशी त्याने खासगी इस्पितळात शस्त्रक्रिया करून घेतली पण ते कार्ड चालत नाही, तू पैसे भर असे इस्पितळाने त्या इसमाला सांगितले. आपण अनेकवेळा त्या इस्पितळाला फोन केले व ते कार्ड स्वीकारा असे सांगितले तरी, कार्ड स्वीकारले जात नाही, असा अनुभव चर्चिल आलेमाव यांनी सांगितला. कामत यांनीही सामान्य माणसाला खूप त्रस होत असल्याचे स्पष्ट केले. कार्ड स्वीकारलेच जात नाही व रुग्णांची मोठी अडचण होते, असे कामत यांनी नमूद केले.
आम्ही लवकरच कार्डाचे नूतनीकरण करण्याची मोहीम नव्याने सुरू करू व सर्व आमदारांनाही त्याची माहिती देऊ असे, आरोग्य मंत्री राणे यांनी सांगितले. सरकारी दिनदयाळ स्वास्थ्य विमा योजनेच्या अंमलबजावणीवेळी समस्या येत आहेत. काही त्रुटी आहेत. काही इस्पितळांना पैसे पोहचले नाहीत अशा काही समस्या आहेतच. त्यासाठी योजनेत सुधारणा करण्याची गरज आहे. आम्ही उपाय काढू, असे आश्वासन मंत्री राणे यांनी दिले.