पणजी : देशात आधीच बेरोजगारी त्यात कोरोना महामारीमुळे ज्यांना रोजगार होते त्यांनाही नोकऱ्या, कामधंदे गमावून बसावे लागण्याची वेळ आली आहे. यामुळे सरकारी नोकऱ्यांकडे पहिल्यापासूनच अनेकांचा ओढा असतो. सरकारी नोकऱ्यांवर लक्ष ठेवून असलेल्या तरुणांना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजावले आहे.
बिहार निवडणुकीत प्रत्येक पक्ष सरकारी नोकरी देण्याची आश्वासने देत आहे. आधी राजदच्या आश्वासनावर टीका करणाऱ्या भाजपानेच आपणही नोकऱ्या देऊ असे सांगत लाखांमध्ये आकडा जाहीर केला आहे. या काळात भाजपाच्याच दुसऱ्या राज्यातील मुख्यमंत्र्य़ांचे वक्तव्य आले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज 'स्वयंपूर्ण मित्र' योजनेचे उद्घाटन केले. यानंतर ते ग्रामपंचायत प्रतिनिधींशी वेब कॉन्फरन्सद्वारे बोलत होते. यावेळी त्यांनी सर्वांनाच सरकारी नोकऱ्या मिळू शकत नाहीत, असे सांगितले.
उद्या जर देव मुख्यमंत्री बनून आला तरीही तो सर्वांना सरकारी नोकरी देऊ शकत नाही, असे सावंत म्हणाले. 'स्वयंपूर्ण मित्र' योजनेतून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेद्वारे गॅझेटेड अधिकारी ग्राम पंचायतींचा दौरा करतील, तसेच खालच्या स्तरापर्यंत सरकारी योजन बनविण्याचे काम करतील. गावात उपलब्ध साधनांचाही अभ्यास केला जाणार आहे. यावरून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.
गोव्यामध्ये बेरोजगारी एक मोठी समस्या बनली आहे. येथे बेरोजगारी दर 15.4 टक्के आहे. सावंत यांनी सांगितले की राज्यातील बेरोजगारांना दरमहा आठ ते दहा हजार रुपये रोजगार मिळायला हवा. राज्यात अनेक रोजगार आहेत मात्र, ते बाहेरील राज्यातील लोक मिळवत आहेत. यामुळे गावांतील बेरोजगारांना नोकरीच्या संधी दिल्या जाणार आहेत.