लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राजकीय फायद्यासाठी काही लोक पक्ष सोडून गेले असले तरी मतदार मात्र काँग्रेससोबतच आहेत. हाथ से हाथ जोडो अभियानला मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून हे चित्र स्पष्ट दिसत असल्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.
सांताक्रुझ येथे सोमवारी आयोजित हाथ से हाथ जोडो अभियानावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, हळदोणेचे आमदार अॅड. कार्लस फरेरा, पक्षाचे नेते अमरनाथ पणजीकर, जॉन नाझारेथ व अन्य उपस्थित होते.
पाटकर म्हणाले की, काँग्रेस पक्षावर अजूनही मतदारांचा विश्वास आहे. त्यामुळेच काही लोक भलेही स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी पक्ष सोडून गेले असतील, पण मतदार अजूनही काँग्रेससोबत आहेत.
या अभियानला राज्यभर मिळत असलेल्या प्रतिसादावेळी ते दिसून येत आहे. या अभियानांतर्गत राज्यातील भाजप सरकारने जनतेची कशी फसवणूक केली, आश्वासनांची पूर्तता कशी केली नाही हे जनतेला दाखवून दिले जात आहे. सरकारविरोधात काँग्रेसने तयार केलेल्या आरोपपत्रांचे मतदारांमध्ये वाटप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
हळदोणेचे आमदार अॅड. फरेरा म्हणाले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. हणजूण येथील पर्यटकांवरील हल्ला, खंडणी घेण्याचे प्रकार असो वा अन्य गुन्हे, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे गंभीर चित्र यावरून दिसून येत आहे. असेच सुरू राहिले तर खाण उद्योगानंतर पर्यटन उद्योगांवरही परिणाम होण्याची भीती आहे. या सर्व गोष्टींना जे कोण पोलिस अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तरच या सर्वांवर आळा बसेल, अशी मागणी त्यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"