म्हापसा - कोटींच्या घरात उलाढाल होणा-या जागतिक स्तरावरील प्रसिद्ध तसेच उत्तर गोव्यातील महत्त्वाची असलेल्या म्हापसा बाजारपेठेत चतुर्थीच्या काळात दिवसा बरोबर रात्रीचे सुद्धा व्यवहार चालत असतात. स्थानिकांबरोबर महाराष्ट्रातील विक्रेते सुद्धा या बाजारपेठेत तीन दिवसाचा तळ ठोकून आपल्या चतुर्थीच्या साहित्याची विक्री करीत असतात.
जगप्रसिद्ध अशा म्हापशातील चतुर्थीचा बाजार मोठ्या प्रमाणावर दर वर्षी भरत असतो. चतुर्थी निमित्त स्थानिकांसोबत महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विक्रेते आपले साहित्य घेवून विक्रीसाठी दाखल होत असतात. बाजारात चतुर्थीच्या साहित्याला असलेली मागणी लक्षात घेऊन बाजारातील उलाढाल दिवसा बरोबर रात्रीची सुद्धा सुरुच असते. सकाळी सुरु झालेली विक्री रात्री उशीरा ११ वाजेपर्यंत सुरुच राहते. त्यानंतर विक्रीसाठी ट्रकातून आलेल्या साहित्याची देवाण घेवाण सुरु होते. त्यामुळे पहाट होऊन जाते. पहाटे पुन्हा लवकर लोक बाजारात दाखल होत असल्याने सहानंतर खरेदी विक्रीला सुरुवात होत असते. हा प्रकार सतत तीन दिवस सुरुच असतो. जशी चतुर्थी तोंडावर येते तशी ग्राहकांची व विक्रेत्यांची गर्दी वाढत जाते. सुरु असलेली ही गर्दी चतुर्थीच्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत सुरुच असतो. त्यानंतर विक्रेते आपली चतुर्थी साजरी करण्यासाठी घरी निघून जातात. चतुर्थीच्या दिवशी मात्र साहित्य स्वस्तात विकले जाते.
महाराष्ट्रातून या बाजारपेठेत माटोळीला लागणाºया साहित्या सोबत केळी, पोफळी, अननस, ऊस, भाज्यांना मोठी मागणी असते. सिंधुदुर्गातील सावंतवाडी, बांदा, शिरोडा, कुडाळ या भागातील विक्रेते हे साहित्य मोठ्या प्रमाणावर घेवून येत असतात. साहित्य दिवसा आणणे शक्य होत नसल्याचे रात्रीच्यावेळी आणले जाते. आलेल्या विक्रेत्यांना या बाजारपेठेत जागेचा प्रश्न सुद्धा असल्याने एकदा मिळालेली जागा सोडून जाणे त्यांच्यासाठी कठीण काम सुद्धा असते. त्यामुळे ते इथेच थांबून विक्री करणे पसंद करतात. विक्रीसाठी आणलेल्या साहित्याचे भावही स्थानिक साहित्यापेक्षा तुलनात्मक स्वस्त ही असतात. त्यामुळे त्यांना मिळणारी मागणी सुद्धा जास्त असते.
या तीन दिवसाच्या काळात या बाजारपेठेत होणारी उलाढाल अंदाजीत कोटीच्या घरातील असते. चतुर्थीच्या साहित्या सोबत बाजारपेठेत कपडे, फुले, फटाके, विजेच्या वस्तू यांच्या विक्रीला सुद्धा बरीच मागणी असते. त्यामुळे चतुर्थीच्या बाजारा सोबत बाजारातील व्यापारी सुद्धा रात्री उशीरापर्यंत थांबून आपला व्यवसाय करीत असतात. त्यांच्या जोडीला किरकोळ विक्रेत्यांचा सुद्धा त्यात समावेश असतो. सावंतवाडीतील विक्रेता तुकाराम सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार चतुर्थीच्या साहित्यासाठी म्हापशातील बाजारपेठ मोठी असल्याने दर वर्षी आपण येत असतो. म्हापशातील महिला विक्रेती शर्मिला गोवेकरने दिलेल्या माहितीनुसार सतत तीन दिवस तळ ठोकून विक्री केली जाते.