संदेश प्रभुदेसाय, ज्येष्ठ पत्रकार
गेल्या २० वर्षांत गोवा कला अकादमीचा झालेला विद्ध्वंस आणि आता दुरुस्तीकरणाच्या नावे किमान साठ कोटी रुपयांचा चुराडा करून संपूर्ण संकुलच गलितगात्र करून टाकण्याच्या गोवा सरकारच्या दुष्कृत्याने उद्विग्न होऊन संपूर्ण गोव्यातील कलाकार, साहित्यिक व कलाप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. 'कला राखण मांड' नावाचे व्यासपीठ उभारून त्यांनी पद्धतशीरपणे तांत्रिक बाबींतला दिसाळपणा उघड्यावर आणला आहे. हे एक फार मोठे आर्थिक व सांस्कृतिक स्कैंडल कसे आहे, त्याचा पर्दाफाश करायला सुरुवात केली आहे. पत्रकार म्हणून नव्हे, तर एक कलासक्त सांस्कृतिक कार्यकर्ता या कर्तव्यभावनेने मीही या आंदोलनात सहभागी झालो आहे.
कला अकादमीचे दिनानाथ मंगेशकर सभागृह नाट्य सादरीकरणासाठी खुले झाले आणि दुरुस्तीकरणाची लक्तरे एकापाठोपाठ एक लोंबू लागली, एक पाऊस आला काय आणि सभागृह अक्षरशः गळायला लागले. भिंतींवरचा प्लास्टरचा मुलामा कोसळायला लागला. पावसाचे पाणी आत घुसून ब्लॅक बॉक्सपर्यंत आले. नाटकाचा प्रयोग करायला गेल्यास ध्वनीयोजना ठीक चालेना, तेव्हा भाड्याची ध्वनीयोजना हा आता कला अकादमीचा रिवाजच झाला आहे. तीच गत प्रकाशयोजनेची, पात्रांवर उजेड पडण्याऐवजी भ्रष्टाचाराचाच उजेड वाकुल्या दाखवतीय. पडदे तर नीट आतही येईनात आणि हव्या त्या गतीने खालीवरही जाईनात. मेकअप करायला गेलात तर सर्व आठही आरशांसमोरील दिव्यांमुळे कलाकारांना अक्षरशः घाम फुटतो. राजदीप नायक व काही तियात्र मोग्यांनी याचे व्हिडियोही केलेत. सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. अर्थातच, सर्वच कलाकार संतापले. त्यातूनच हे आंदोलन उभे राहिले.
आता या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी काही कलाकारांना हाताशी धरून एक प्रतिआंदोलन सुरू करण्याची धडपड चाललीय. आणि त्याला पाठिंबा मिळवण्यासाठी स्वतः कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडेंसह त्यांचे काही समर्थक कलाकार खोट्या-नाट्या गोष्टी लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा खोटारडेपणा म्हणजे "हा कला अकादमीविषयीचा मांग नव्हे, तर गोविंद गावडेवरचा फोग." "काही मूठभर असंतुष्ट कलाकारांनी गोविंद गावडेंना टार्गेट करण्यासाठी हे आंदोलन सुरू केलेले आहे." शिवाय ते "गोविंद गावडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा मागत आहेत" असा अपप्रचार बिनदिक्कत सुरू आहे. शिवाय कला-संस्कृतीचे आमचे गोव्याचे मुखत्यार खुद्द गोविंद गावडे "त्यांना कला अकादमीविषयी प्रेम नव्हे, गावडे आडनावाची अॅलर्जी आहे" अशी आक्षेपार्ह विधाने करत आहेत, कावीळ झालेल्याला सगळीकडे पिवळेच दिसते, तसे राजकारण्यांना सगळ्याच गोष्टीत राजकारण दिसते; ते आम्ही समजू शकतो. परंतु आमच्या कलाकार साहित्यिक बंधुभगिनींनी त्याला बळी पडू नये म्हणून या आरोपांमागील सत्य सांगण्यासाठी हा लेखप्रपंच.
'कला राखण मांड'ने कधीच गोविंद गावडेंचा राजीनामा मागितलेला नाही. उलट पहिल्या दिवसापासून आमची संस्था मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, कला व संस्कृती मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घडवून आणावी, अशी मागणी करीत आहेत. त्याशिवाय कला अकादमीची आज जी दुरवस्था झालेली आहे, ती कधीपासून सुरू आहे याची श्वेतपत्रिका काढावी व त्यासाठी सरकारने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकरवी चौकशी करावी, ही आमची मागणी आहे. याविषयी ठराव झालेले आहेत, जाहीर मागण्या झालेल्या आहेत व त्यासंबंधीचे निवेदनही मुख्यमंत्र्यांना दिलेले आहे. या निवेदनाला पंधरवडा उलटून गेला तरी स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांचे प्रशासन अजूनही मूग गिळून गप्प आहे. या निःपक्षपाती चौकशीतून या सांस्कृतिक भ्रष्टाचारात कोण गुंतलेत ते सिद्ध झाले की मग मंत्रिपदाचा राजीनामाच काय, राजकारणातून हद्दपारीलादेखील कदाचित सामोरे जावे लागेल, कारण साहित्य- कलाकारांच्या संवेदनशीलतेला जो हात घालतो तो रसातळाला जातोच, हे इतिहासाने कित्येकदा सिद्ध केलेले आहे. त्यात गोवा तर कलाकारांची खाणच आहे.
होय, पण गोविंद गावडेंच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. कला अकादमीच्या दुरवस्थेवर सोशल मीडियावर चर्चा झाल्यावर आम्ही काहीजणांनी १७ जून रोजी पणजीत एक महाचर्चा आयोजित केली होती. सर्वांना जाहीर निमंत्रण दिले होते. कोण येतील, किती येतील, काय बोलतील याचा अंदाज नसल्याने 'गुज' संघटनेच्या ३०-४० लोक मावतील अशा छोट्याशा सभागृहात ही महाचर्चा झाली. अपेक्षेपेक्षा जास्त लोक आले. कलाकार म्हणून स्वतः गोविंद गावडेही आले. कुणी काय बोलावे यावर असल्या खुल्या बैठकीत कुणी बंधने घालू शकत नाही. कुणी सांगितले कला अकादमीत साधनसुविधा उत्कृष्ट आहेत, तर काहींनी काय काय नाही याची जंत्रीच वाचली. त्यात दोघा-तिघांनी गावडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असेही म्हटले. परंतु बैठक संपताना काही ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले. त्यात गावडेंच्या राजीनाम्याची मागणी नव्हती, वा त्यांना एकटघालाच टार्गेट करण्याचीही भूमिका नव्हती, २००४ मध्ये इफ्फी सुरू झाला तेव्हापासून कला अकादमीची दुर्दशा कशी व्हायला लागली आहे, तेच या महाचर्चेत सविस्तरपणे चार्लस कुरैय्या फाउंडेशनने स्पष्ट केले होते.
तेव्हा यात किती वर्षांत कोणाकोणाचे हात गुंतलेत, ते आम्हाला आणून घ्यायचे आहे हीच प्रमुख मागणी होती. म्हणून तर श्वेतपत्रिका. आता दोघा-तिघांनी वैयक्तिक पातळीवर केलेली राजीनाम्याची मागणी ही संपूर्ण सभेचीच होती, अशी हटवादी भूमिका कुणी घ्यायला लागले, तर मग त्यात गोविंद गावडेही सहभागी होते असा त्याचा अर्थ होत नाही का? कारण ते स्वताही या महाचर्चेला उपस्थित होते, त्यांनीच स्वतःचा राजीनामा मागितला? या महाचर्चेचा परिपाक म्हणून त्यानंतर काही दिवसांनी व्यवस्थित बैठका व चर्चा होऊन 'कला राखण मांड' या संस्थेची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत या संस्थेने कधी गावडेंचा राजीनामा मागितलेला नाही वा त्यांना केवळ एकट्याला टार्गेटही केलेले नाही. मात्र "मला टार्गेट करतात", "माझा राजीनामा मागतात", "हे राजकीय कारस्थान आहे", "यांचा बोलविता धनी वेगळाच आहे" असा थयथयाट खुद्द गोविंद गावडेंनीच चालवला आहे. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींचा प्रतिकार करण्यासाठी कदाचित हा त्यांचा आटापिटा असेलही, परंतु त्यात नाहक हे सांस्कृतिक आंदोलन बदनाम केले जातेय.
आमचे आंदोलन सुरू झाल्यानंतर काही कलाकारांनी एक पत्रकार परिषद घेतली, त्यात कला अकादमीवर भाष्य करण्याऐवजी गोविंद गावडेंचे समर्थनच जास्त करण्यात आले. तद्नंतर मागच्या आठवड्यात आमच्या काही कलाकार मित्रांनी 'गोवा कलाकार एकवट' या बॅनरखाली पणजीत एक सभा घेतली. त्यातही तेच झाले. कला अकादमीच्या बांधकामाबाबत आणि साधनसुविधांचे तीन तेरा वाजवले आहेत, त्यावर कोणी जास्त ठासून बोललेच नाहीत. उलट काही त्रुटी (१) राहिल्या असतील तर त्या दुरुस्त केल्या जातील, अशीच सगळी गुळमुळीत भाषा, गोविंद गावडेंचें गुणगानच जास्त चालले होते. मध्ये तर कुणी 'गोविंद गावडे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है" अशा घोषणाही दिल्या. नंतर तर गायक शौनक अभिषेकींनी सगळे पितळच उघडे पाडले. 'तुम्ही गोव्यात आहात तर या सभेला जा म्हणून गोविंद गावडेंचा फोन आला म्हणून मी इथे आलो" असे त्यांनी सरळ जाहीरच करून टाकले. त्यामुळे या सभेचा 'बोलविता धनी' कोण आहे, ते मात्र पूर्णतः स्पष्ट झाले. हे ऐकताना त्या सभागृहातील आमच्या कलाकार मित्रांची काय अवस्था झाली असेल तेच बापुडे जाणोत.
आमच्या या आंदोलनात कोणा एकाला टार्गेट करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण या सांस्कृतिक भ्रष्टाचारात कित्येक मंत्री, मुख्यमंत्री, पक्ष व सरकारांचे हात बरबटलेले आहेत. ते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्री अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी केली तर सरकार कानावर केस काढून बसलेय, म्हणून शेवटी आम्हीच तांत्रिक बाजू समजून घेण्यासाठी धडपड केली. मडगावात ७ जुलैला चार्लस कुरैय्या फाउंडेशनचे सविस्तर छायाचित्र सादरीकरण घडवून आणले. तेव्हा कला अकादमीची मोडतोड चक्क १९९६ मध्येसुद्धा झाली होती, त्यानंतर २००४ साली 'इफ्फी'साठी मोठ्या प्रमाणात मोडतोड केली गेली आणि आता दुरुस्तीकरणाच्या नावे काय तोडफोड चालली आहे, त्याविषयी डोक्यात लख्ख प्रकाश पडला. हे सादरीकरण बघायला आम्ही आमदारांनाही बोलावले होते. कारण विधानसभा अधिवेशन तोंडावर होते. अर्थात, केवळ विरोधी पक्षांचे आमदार आले. विरोधी पक्ष नेते यूरी आलेमांव यांनी तिथेच जाहीर केले "मी येत्या मंगळवारी संबंधित अधिकारी, 'मांड'चे सदस्य व 'फाउंडेशन'चे वास्तुकलाकार यांना घेऊन कला अकादमीचे इन्स्पेक्शन करीन."
९ जुलैला झालेल्या या इन्स्पेक्शनवेळी आणखीन एक महत्त्वाचे तंत्रज्ञ खास मुंबईहून आले. आमच्या 'मांड'चे सदस्य फ्रांसिस्को कुएल्हो यांच्या विनंतीवरून, ज्यांना 'साउंड मॅन ऑफ इंडिया' किताब मिळाला आहे ते रॉजर ड्रेगो, त्यांनी ध्वनियोजना व प्रकाश योजनेचे सगळे प्लॅन मागवून घेऊन तपासले. तर काय? बाजारात आज विक्रीसाठीसुद्धा उपलब्ध नसलेली व कधीच कालबाह्रा झालेली उपकरणे तिवे बसवण्यात आली आहेत, इन्स्पेक्शन करताना बघितले तर संपूर्ण संकुल आतबाहेरून गळतेय. मागच्या बाजूला वेगळ्या इमारतीत असलेली वातानुकुलन यंत्रणा चक्क दिनानाथ मंगेशकर सभागृहाच्या छतावर आणून बसवलीय. त्या 'एसी'चा आवाज तर सभागृहात घुमतोच, परंतु त्यामुळे छत आणि भिंती थरथरताहेत. म्हणजे खुल्या रंगमंचापाठोपाठ या सभागृहाचे छतही पाडण्याची योजना आहे की काय, या कल्पनेनेच आमचा थरकाप उडाला. आणि उद्या प्रयोग सुरू असताना काही दुर्घटना घडली तर? त्याची जबाबदारी कोण घेणार?
या अशा एक नव्हे अनेक गोष्टी आहेत. दुरुस्तीच्या नावे चांगल्या होत्या त्या गोष्टीसुद्धा उखडून काढून तिथे दुय्यम दर्जाच्या गोष्टी बसविण्यात आल्या आहेत. रंगमंचाचे तर अक्षरशा तीन तेरा वाजवले आहेत. अगदी संगीताचे वर्गसुद्धा सोडलेले नाहीत. संपूर्ण देशाची शान असलेले गोव्यातील हे आमचे कलेचे मंदिर अक्षरशः मृत्युपंथाला लागले आहे. गोव्याच्या कला-संस्कृतीशी सरकारी यंत्रणेने वा भ्रष्ट राजकारण्यांनी केलेला हा अधिकृत व्यभिचार आहे. अशा खडतर प्रसंगी काही राजकारण्यांच्या क्षुद्र स्वार्थी राजकारणाला वा काही हजार वा लाख रुपयांच्या अनुदानांना बळी पडून कलाकार गप्प बसले तर ती कला व संस्कृतीशी केलेली प्रतारणा ठरेल हे लक्षात असूद्या. अजूनही वेळ गेलेली नाही. गोव्यातील आमच्या सर्व मायमोगाच्या कलाकार-साहित्यिकांना व साहित्य-कला रसिकांना हात जोड्डून कळकळीची विनंती. हे भयानक सत्य जाणून घ्या. या सांस्कृतिक चळवळीला हातभार लावायचा की नाही ही तुमची मर्जी, निदान तिला विनाकारण बदनाम तरी करू नका.