डिचोली : ‘राज्यातील प्रत्येक घरातून किमान एक जण पदवीधर व्हावा अशी माझी संकल्पना आहे. प्रत्येक घरातील एक व्यक्ती पदवीधर होण्यासाठी संकल्प यशस्वी करण्यासाठी इग्नू व इतर विद्यापीठांची मदत घेतली जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्धवट सोडले आहे किंवा ज्यांना इच्छा आहे, त्यांना पदवी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी केली. हरवळे (ता. डिचोली) येथे सुमारे चार कोटी खर्चून १४ विकास योजनांचा प्रारंभ मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, ‘ज्यांना आपले शिक्षण पूर्ण करायचे आहे, पण जे युवक आता कामावर जातात, नोकरी करतात, त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या विद्यापीठांशी जोडले जाईल. युवकांना पदवीचे शिक्षण पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. ज्ञानाची लालसा ठेवून युवकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवावे. शिक्षण ही सातत्याने करायची प्रक्रिया असल्याने नोकरी मिळाली म्हणून शिक्षण थांबवण्याची गरज नाही. तशी व्यवस्था करण्याचा आपला संकल्प आहे. त्यासाठी हर घर पदवीधर हा संकल्प यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘विकासाच्या योजना राबवण्यासाठी गावातील लोकांनी जागा उपलब्ध केल्यास प्रत्येक पंचायतीत सुसज्ज सभागृह उभारण्यास मदत केली जाईल. इतर आर्थिक उत्पन्न मिशवून देणारे स्रोत यातून निर्माण करणे सहज शक्य आहे. त्यासाठी गावाने एकी दाखवावी.’
यावेळी संजय नाईक, स्वयंपूर्ण मित्र सतीश वागोणकर, सरपंच अंकुश मळीक, राजू मळीक, गुरुप्रसाद मळीक, ममता दिवकरव इतर मान्यवर उपस्थित होते.