फोंडा नगरपालिकेने जुन्या मुक्तीधामाचा कायापालट करून एक आदर्श निर्माण केला आहे. सर्व सोयी साधनांनी युक्त असे एक आकर्षक मुक्तिधाम इथे साकार झाले आहे. इतर नगरपालिकांनी सुद्धा हा आदर्श घेताना चांगल्या स्मशानभूमी चांगल्या तऱ्हेने बांधून घ्याव्यात. असे आवाहन कृषी मंत्री रवी नाईक यांनी केले. फोंडा नगरपालिकेच्या नूतनीकरण केलेल्या मुक्तीधामाचे लोकार्पण सोमवारी त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष रितेश नाईक, मुख्याधिकारी योगीराज गोसावी, स्थानिक नगरसेवक प्रतीक्षा प्रदीप नाईक इतर नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की नगरपालिका क्षेत्रात कोणताही चांगला प्रकार उभा करायचा असल्यास सर्व नगरसेवक, अधिकारी व नागरिकांचे सहकार्य गरजेचे असते. फोंडा नगरपालिका चे नगराध्यक्ष आज सर्वांना बरोबर घेऊन जात आहेत म्हणून प्रकल्पाची उभारणी दुप्पट वेगात होत आहे .
यावेळी बोलताना नगराध्यक्ष रितेश नाईक म्हणाले की मुक्तिधामाचे नूतनीकरण करताना येथे येणाऱ्या लोकांना आरामदायी वातावरण मिळेल याची आम्ही व्यवस्था केलेली आहे .लाकडे सुरक्षित रहावीत म्हणून खास उपाययोजना आहेत. त्याचबरोबर अंत्यसंस्कार करत असताना कमीत कमी लाकडा जाळली जातील यासाठी नवीन स्टॅन्ड बनवून घेतले आहेत. सदर प्रकल्पाचे काम चालू असताना येथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची काळजी सुद्धा आम्ही घेतली होती.