देशाच्या विविध भागांमध्ये मतदानप्रक्रियेला पहिल्या दोन टप्प्यांमध्ये फार मोठा प्रतिसाद मिळाला नव्हता. बहुतांश भागात सरासरी सत्तरहून कमी टक्केच मतदान झाले होते. तिसऱ्या टप्प्यातील मतदानप्रक्रिया काल गोव्यात पार पडली.
गोमंतकीयांनी ७५ टक्क्यांहून अधिक मतदान केले. हे प्रमाण आजच्या काळात खूप मोठे आणि उत्साहवर्धक आहे. निवडणूक आयोगाचे मतदान प्रक्रियेत मोठे योगदान आहेच. शिवाय भाजपच्या प्रचारयंत्रणेचे, कार्यकर्त्यांचेही हे यश आहे, मतदानाचे प्रमाण वाढावे म्हणून पक्षाने लावलेल्या व्यवस्थेचेही हे यश आहे पन्ना प्रमुखसारखी पद्धत स्वीकारून सर्वच नेते व कार्यकर्त्यांना त्यांनी कामाला लावले. यामुळेही मतदानाचे प्रमाण वाढले. गोव्यातील प्रसारमाध्यमांनीही गेले दीड महिना जी प्रचंड आगृती केली, तिलाही मतदारांनी प्रतिसाद दिला, हे मान्य करावे लागेल हिंदू मतदारांची संख्या जास्त असलेल्या भागांतून जास्त प्रमाणात मतदान व्हायला हवे, असा भाजपचा प्रयत्न होताच. तो प्रयत्न यशस्वी झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढता येतो. विधानसभेच्या हिंदुबहुल मतदारसंघांत महिलांनी जास्त प्रमाणात मतदान केले आहे. अर्थात, सगळे मतदान ठरावीक एका पक्षाला किंवा ठरावीक एक-दोन उमेदवारांसाठीच झाले आहे, असे म्हणता येत नाही.
भाजप, काँग्रेस व 'आरजी'ने देखील यावेळी अधिकाधिक प्रचार केला. लाखो लोकांपर्यंत या पक्षाचे उमेदवार, नेते व कार्यकर्ते पोहोचले. यामुळे निवडणुकीबाबत व मतदानाविषयी खूप जागृती होण्यास मदत झाली. सर्वांच्या प्रयत्नांचा एकत्रित परिणाम दिसून आला. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दक्षिण गोव्यात आणि गृहमंत्री अमित शहा यांची उत्तर गोव्यात जी सभा झाली, त्या सभेवेळी लोटलेल्या गर्दीतूनही गोव्यात मतदान वाढेल हे कळून येत होते. नेमके तसेच घडले आहे. मोठ्या संख्येने नवमतदार, युवक-युवती, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांनीही आपला हक्क बजावला. होय, गोव्यात तरी खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव काल पाहायला मिळाला.
मतदानप्रक्रिया गोव्यात शांतपणे पार पडली. शांततापूर्ण मतदानासाठी गोवा प्रसिद्ध आहेच. बोटावरील शाई लगेच नष्ट होते, अशा तक्रारी मात्र आल्या, पणजीसह काही भागांमध्ये मतदान केंद्रांवर बोटांना मतदानापूर्वी जी शाई लावली गेली ती योग्य दर्जाची नव्हती. ती लगेच पाण्याने पुसून टाकता येते, असे काही मतदारांनी दाखवून दिले. तसे फोटोही सोशल मीडियावर टाकले. काही ठिकाणी यामुळे मतदानप्रक्रिया थोडी संथ झाली. काही मिनिटातच शाई बदलून अडचण दूर करण्यात आली. बोगस मतदान किंवा दोन गटांत वाद वगैरे घटना घडल्या नाहीत. फक्त युरी आलेमाव व विजय सरदेसाई यांनी अनुक्रमे कुंकळ्ळी व फातोड्र्धामधील एक-दोन प्रकारांविषयी जाहीर कैफियत मांडली. फातोडर्भात मतदान केल्यानंतर एका महिलेने फोटो काढण्याचा प्रयत्न केला, आपण कुणाला मत दिले ते दाखविण्यासाठी फोटो काढण्याचा हा प्रयत्न झाला. हा प्रकार लोकशाहीविरोधी व घटनाविरोधी आहे, असे सरदेसाई म्हणाले. बाकी गोव्यात निवडणुकीवेळी गंभीर असे गैरप्रकार घडले नाहीत.
सगळीकडे सकाळपासूनच मतदारांच्या रांगा होत्या. सासष्टी तालुक्यातील अल्पसंख्याक मतदारांकडे सर्वांचेच लक्ष होते. सकाळी पहिल्या दोन तासांत सासष्टीतील बरेच मतदार मतदान करून घरी गेले. नंतर तुलनेने त्या तालुक्यात प्रक्रिया संथ झाली. तिथे अन्य तालुक्यांच्या तुलनेत मतदान कमी झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात, तसेच मंत्री विश्वजित राणे, आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या सत्तरी तालुक्यात प्रचंड मतदान झाले आहे. सांगे विधानसभा मतदारसंघातील साळजिणी बूथवर शंभर टक्के मतदान झाले.
सर्व मंत्री, आमदारांनी काल देखील कष्ट घेतले. पणजी मतदारसंघात तुलनेने कमी मतदान झाले. यामागील खरी कारणे भाजपला आणि आमदार मोन्सेरात यांना शोधावी लागतील, मुख्यमंत्री सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे काल राज्यभर फिरले, मुख्यमंत्र्यांनी दक्षिण गोव्यात तळच ठोकला होता. दिगंबर कामत यांच्यासोबत त्यांनी मडगावच्या मोती डोंगर वगैरे भागांना भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या कष्टांना दाद द्यावीच लागेल.