मडगाव : माजोर्डा येथील कॅसिनो मारहाण प्रकरणात गोव्याचे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्याविरुद्ध 4 डिसेंबर रोजी आरोप निश्चित होणार आहे. या खटल्यात त्यांचे मित्र मॅथ्यू दिनीज हेही सह आरोपी आहेत. आज शुक्रवारी हा खटला सुनावणीस आला असता, दोन्ही संशयित काही कारणास्तव न्यायालयात अनुपस्थित होते. मागाहून न्यायालयाने नवीन तारीख निश्चित केली.
मॅथ्युज यांनी आपल्यावर झालेल्या आरोप निश्चितीला सत्र न्यायालयात यापुर्वी आव्हान दिले होते. 23 ऑक्टोबर रोजी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष एडगर फर्नाडीस यांनी हा आव्हान अर्ज फेटाळून लावला होता.
2009 मध्ये पाशेको हे पर्यटन मंत्री असताना झालेल्या या प्रकरणात मडगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आश्र्विनी कांदोळकर यांनी पाशेको व दिनीज या दोघांविरोधात भादंसंच्या 448 (बेकायदा घुसखोरी), 384 (जबरदस्ती करणो) व 506-2 (गंभीर स्वरुपाची धमकी देणो) या गुन्हय़ाखाली आरोप निश्र्चित करण्याचा आदेश दिला होता. या निवाडय़ाला दिनीज यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.
हा आव्हान अर्ज फेटाळून लावावा अशी मागणी सरकारी वकील सुभाष देसाई यांनी करताना कनिष्ठ न्यायालयाचा निवाडा सुसंगत व योग्य असून त्यात हस्तक्षेप करण्यास कुठलाही वाव नाही. ही घटना प्रत्यक्ष पहाणारे अनेक साक्षीदार असून त्यामुळे या खटल्यात सुनावणी घेऊन अभियोग पक्षाला पुरावे सादर करण्याची संधी देणो आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला होता. तर संशयिताच्यावतीने बाजु मांडताना अॅड. विवेक नाईक यांनी आपल्या अशिलाला या खटल्यात विनाकारण गोवल्याचा आरोप केला होता.
या प्रकरणाची पाश्र्र्वभूमी अशी की, माजोर्डा बीच रिसॉर्टमधील ह्यकॅसिनो ट्रेझर्सह्ण या कॅसिनोतील अधिकारी अशोककुमार राव यांनी पाशेको व दिनीज यांच्या विरोधात कोलवा पोलीस स्थानकात तक्रार केली होती. 30 व 31 मे 2009 या दरम्यानच्या रात्री दोन्ही संशयितांनी माजोर्डा कॅसिनोत येऊन दंगामस्ती केली व आपल्याला जीवंत मारण्याची धमकी दिली. पाशेको यांनी कॅसिनोचा डिलर रेशम पोखरेल यालाही धमकावण्यास सुरुवात केली. आपण 3.69 लाख रुपये जिंकले असून तेवढी रक्कम आपल्याला देण्याचा तगादा त्यांनी पोखरेल याच्याकडे लावला होता असे राव यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले होते.