लोकमत न्यूज नेटवर्क पेडणेः मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतीच भेट दिली, तेव्हा १२०० भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्याचे जाहीर केले. ही घोषणा ताजी असतानाच आमदार प्रवीण आर्लेकर यांनी १२०० नव्हे, तर १५०० नोकऱ्या दिल्याचे जाहीर केले आहे.
त्यामुळे मोपा विमानतळावर कुणाकुणाला कसल्या प्रकारच्या नोकऱ्या व कोणत्या पंचायत क्षेत्रातील युवकांना नोकऱ्या दिल्या, त्यांची यादी आमदार आर्लेकर यांनी विमानतळ प्राधिकारणाकडून घेऊन संभ्रम दूर करावा, अशी मागणी पेडणेवासीयांनी केली आहे.
मोपा विमानतळासाठी मोपा, वारखंड, कासारवर्णे, चांदेल, पोरस्कडे या भागातील शेतकऱ्यांनी ९० लाखांपेक्षा जास्त जमिनी प्रकल्पासाठी गेल्या आहेत. या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना अजून ८० टक्के शेतकऱ्यांना त्यांची कागदपत्रे जुळवाजुळ होत नसल्यामुळे मोबदला मिळालेला नाही. पर्याय म्हणून त्यांना अजून मोपा विमानतळावर कसल्याच प्रकारच्या रोजगाराच्या संधीही उपलब्ध झालेल्या नाहीत.
मोपा विमानतळावर टॅक्सी व्यवसाय करणारे कोण आहेत? ज्या मोपा विमानतळाचे स्वप्न पेडणेवासीयांना दाखवले, रोजगाराच्या संधी देणार म्हणून ग्वाही दिली, तर मग एकही पेडणे तालुक्यातून मोपा विमानतळावर कामासाठी घेऊन जाणारी प्रवासी कर्मचारी बस का फिरकत नाही. अनेक बसगाड्या सत्तरी, वाळपई, साखळी या भागांतून कशा काय येतात? असा प्रश्न पेडणेवासीयांनी उपस्थित केला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भूमिपुत्रांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप होत आहे.
कायमस्वरुपी नोकऱ्यांची आकडेवारी जाणून घेऊनच घोषणाबाजी करावी
मोपा विमानतळासाठी सरकारने जमिनी घेतल्या, मात्र त्यांना योग्य मोबदला अद्याप मिळालेलाच नाही. विमानतळ सुरू होऊन सहा महिने उलटले, तरी पेडणे तालुक्यातील भूमिपुत्रांना अद्यापपर्यंत टॅक्सी स्टॅण्ड दिलेला नाही. विमानतळावर किती कामगार घ्यावेत, कुठल्या राज्यातील घ्यावेत, कुठल्या पद्धतीने विमानतळ चालवावा याबाबतचे नियोजन कंपनीकडून केले जात आहे. गोवा सरकारला हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार कंपनीने दिलेला नाही. मग, स्थानिकांना १२०० नोकचा कुठून देणार? मोपा विमानतळावर कायमस्वरूपी किती नोकऱ्या आहेत, हे जाणून घ्यावेत आणि नंतरच घोषणाबाजी करावी असे शेतकरी उदय महाले यांनी सांगितले.
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे गोव्यातील लोकांसाठी आहे. हा केवळ दिखावा आहे. दलाल आणि राजकारण्यांसाठी ही एक सोन्याची खाण आहे. लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने दुखावलेल्या कार्यकर्त्यांना जनतेला नोकऱ्यांचे गाजर दाखवले जात आहे. स्थानिकांना १२०० नोकऱ्या दिल्या आणि १२ हजार नोकऱ्या मतदान झाल्यावर दिल्या जातील, असे आश्वासन दिले होते. निवडणुकीपर्यंत हे असेच चालणार आहे. मोपा विमानतळावरील भूमिपुत्रांना पाच टक्के सुद्धा नोकऱ्या दिल्या गेलेल्या नाहीत. - उदय महाले, उगवे.
१२०० नोकऱ्यांमध्ये विमानतळ तयार करणाऱ्या बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेल्या मेगावाइड कंपनीच्या अंतर्गत बांधकाम टप्प्यातील नोकऱ्यांचा विचार करून आणि ज्यांनी तेथे करार पूर्ण केला होता आणि आधीच कामे सोडून गेलेल्यांची नोंद असू शकते, असे मत मोपा सरपंच सुबोध महाले यांनी व्यक्त केले. यातील अनेकांना त्रास देऊन नोकरी सोडण्यास भाग पाडले, असे कामगारच सांगतात. आता आम्ही प्रत्येक पंचायत क्षेत्रातील बेरोजगारांसाठी किमान २५ कायमस्वरूपी नोकऱ्यांची मागणी करीत आहोत. कंपनी सरकारची दिशाभूल करतेय. -सुबोध महाले, सरपंच, उगवे तांबोसे, मोपा पंचायत.