फोंडा - अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी रविवारी एका ट्रकसह आठ लाखाची दारू पकडल्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा अनमोड येथील चेक नाक्यावर बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणारी खासगी बस जप्त केली आहे. गेल्या काही दिवसापासून अशाप्रकारच्या कारवाईत वाढ झाली असून आतापर्यंत एक कोटी रुपयां पेक्षाही अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. बुधवारी रात्री केलेल्या कारवाईत खासगी बस चालक सुप्रीम मंजुनाथ (बंगलोर) याला अटक करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती नुसार मागच्या एका महिन्यात मोठ्या प्रमाणावर दारू वाहतूक करणारी प्रकरणे पकडल्यानंतर सीमेवरील कर्नाटकातील अबकारी खाते सतर्क झाले आहे. गोव्यातून बंगलोर येथे बुधवारी मध्यरात्री जाणाऱ्या केए - ५१- एएच -७३६२ क्रमांकाची खासगी बसची नेहमीप्रमाणे झडती घेतली असता अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना सुमारे ६५ लिटर दारू बसमध्ये सापडली. यासंदर्भात खासगी बस चालकाला अटक करण्यात आली आहे.अनमोड अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी बस सह सुमारे ४५ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. कर्नाटकात विधानसभा निवडणूक जवळ आल्याने येत्या काही दिवसात गोव्यातून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनमोड येथील अबकारी खात्याचे उपनिरीक्षक श्रीकांत तळसूदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी रात्री कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. मागच्या तीन महिन्यात किमान दहा ते पंधरा वेळा तरी अनमोड च्या अबकारी अधिकाऱ्यांनी गोव्यातून कर्नाटकात जाणारी दारू पकडली आहे. सदरची सर्व वाहने हि मोले चेक नाक्यावरूनच गेली होती. मोले येथे सुद्धा चेक नाका असताना एवढ्या लाखो रुपयाची दारू सातत्याने कर्नाटकात जातीच कशी हा प्रश्न आता निर्माण होत आहे .कदाचित मोले येथील अधिकाराच्या संगणमतानेच हि दारू पाठवण्यात येत असल्याचा संशय आता बळावू लागला आहे