पणजी : जैका प्रकरणात लुईस बर्जर कंपनीकडून लाच घेतल्याच्या प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर पणजी विशेष न्यायालय बुधवारी सकाळी १० ते १०.३० या दरम्यान निवाडा देणार आहे. या निवाड्यावर कामत यांचे भवितव्य अवलंबून असून निवाडा विरोधात गेल्यास कामत यांना त्वरित अटक करण्यासाठी क्राईम ब्रँचने मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. लाच प्रकरणात कामत यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर उभय पक्षांकडून युक्तिवाद पूर्ण झाले होते आणि निवाडा बुधवारी ठेवण्यात आला होता. अर्जाचे समर्थन करताना कामत यांचे वकील सुरेंद्र देसाई यांनी क्राईम ब्रँचकडून राजकीय हेतूने कामत यांना अटक करण्याचे षड्यंत्र रचल्याचा दावा केला. अमेरिकन न्यायालयातून कागदपत्रे न मिळविताच या प्रकरणात गोव्यात गुन्हा दाखल करणे हा प्रकार क्राईम ब्रँचचा अपरिपक्वपणा दर्शवीत आहे. तसेच कामत यांच्याविरोधात तपास यंत्रणेकडे संशयितांच्या सीआरपीसी १६४ कलमाअंतर्गत नोंदविण्यात आलेल्या जबाबाशिवाय कोणताही सबळ पुरावा नाही, असा दावा केला आहे. तसे पुरावे आहेत असे गृहीत धरले, तरीही कामत यांना कोठडीत घेण्याचे पोलिसांना कारण काय, असा सवालही केला आहे. अटकपूर्व जामिनाला हरकत घेताना क्राईम ब्रँचचे वकील गुरुप्रसाद कीर्तनी यांनी कामत हे चौकशीला सहकार्य करीत नसल्याचा दावा केला आहे. तसेच जैकाचे माजी अधिकारी आणि लाच देताना हजर राहिलेल्या लुईस बर्जर कंपनीच्या माजी अधिकाऱ्यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडे दिलेल्या कबुली जबाबाच्या जोरावर युक्तिवाद केला. तसेच कामत हे पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्नही करण्याची भीती व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर न्यायाधीश भारत देशपांडे काय निवाडा देतील, याकडे सर्व गोमंतकीयांचे लक्ष लागून आहे. २१ जुलै रोजी या प्रकरणात तपास अधिकारी निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी गुन्हा नोंदवून क्राईम ब्रँचतर्फे चौकशी सुरू करण्यात आली होती. सर्वांत अगोदर आनंद वाचासुंदर यांना अटक करण्यात आली होती. वाचासुंदर यांनी पोलिसांना माफीचे साक्षीदार होण्याची तयारी दाखविल्यानंतर दिगंबर कामत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. दुसऱ्या रात्री चर्चिल आलेमाव यांना अटक केली होती. (प्रतिनिधी)
उत्कंठा शिगेला..!
By admin | Published: August 19, 2015 1:45 AM