लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विकसित गोव्याचे स्वप्न साकार करण्यासाठी गोव्यात दारू पिण्यास बंदी लागू करावी, अशी मागणी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी अचानक केल्यामुळे मंगळवारी गोवा भाजपमध्ये खळबळच उडाली. कोणत्याच मंत्री, आमदाराने उगाच सर्व विषयांवर काहीही बोलू नये, अशा प्रकारची सूचना यापूर्वी सर्वांनाच मुख्यमंत्र्यांनी करूनदेखील प्रेमेंद्र शेट यांनी दारूबंदीचा आग्रह धरल्याने सरकारमधील अनेक मंत्री व आमदारांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
गुजरातसह काही राज्यांत दारूबंदी आहे. याच बंदीचा उल्लेख करत प्रेमेंद्र शेट यांनी गोव्यातही तशीच ती लागू करावी, असा मुद्दा त्यांनी मांडला होता. त्यास आमदार मायकल लोबो, आमदार डिलायला लोबो, आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्यासह अनेकांनी हरकत घेतली. दारूचे उत्पादन सुरू ठेवता येईल; पण गोव्यात दारू पिण्यास बंदी असावी, असे प्रेमेंद्र शेट यांनी मीडियालाही सांगितले होते. विधानसभेतही ते बोलले होते. विकसित गोव्यासाठी हे करणे गरजेचे आहे, असे शेट यांनी सुचविल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी सोमवारीच सर्व भाजप आमदारांची सकाळी बैठक घेतली होती. सनबर्न, रोमी कोंकणी किंवा अन्य वादाच्या विषयांवर आमदारांनी वादग्रस्त काही बोलू नये, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. प्रेमेंद्र शेट यांच्या मागणीनंतर मात्र भाजपलाही धक्का बसला. लगेच काल भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी शेट यांना फोन करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. दारूबंदीची मागणी पक्षाने कुठेही केलेली नाही, याची कल्पना तानावडे यांनी शेट यांना दिली, असे समजते.
मद्य नाही तर पर्यटक कसे येतील
प्रेमेंद्र शेट स्वतः मद्य पीत नाहीत. पण, त्यांनी गोव्यात दारूबंदी लागू करण्याची मागणी करणे चुकीचे आहे, असे मायकल लोबो, डिलायला लोबो वगैरे म्हणाल्या. पर्यटक गोव्यात येतील तरी कशाला व रेस्टॉरंट्स वगैरे कसे चालतील, असा प्रश्न लोबो यांनी केला. आमदार दिव्या राणे यांना पत्रकारांनी विचारले असता, मद्य वगैरे पर्यटनाचाच भाग आहे. त्यामुळे पर्यटक गोव्यात येतात तेव्हा मद्य वगैरे पिणारच, असे राणे म्हणाल्या.