लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पुढील महिन्यात, ३ डिसेंबरनंतर गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना होईल, अशी माहिती मिळाली आहे. बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांना डच्चू देऊन त्याजागी नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना संधी दिली जाऊ शकते.
या विषयावरून मंत्रिमंडळात अस्वस्थता निर्माण झाली आहे. काब्राल यांच्या बाजूने बहुतांश मंत्री असून, काब्राल यांना डच्चू दिला जाऊ नये, असे मत अनेकजण व्यक्त करत आहेत. काब्राल हे नुकतेच दिल्लीला जाऊन आले. त्यांना भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी बोलावले होते. त्यांना मंत्रिपद सोडावे लागेल, याची कल्पना आलेली असू शकते, अशी चर्चा काही मंत्र्यांमध्ये पसरली आहे. आलेक्स सिक्वेरा यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये आणताना मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले गेले होते. त्यामुळे आपल्याला मंत्री करा, असा तगादा सिक्वेरा यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे लावला होताच. सिक्वेरा यांची मागणी मान्य होईल, असे दिसते.
सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका चालू आहेत. त्याचा निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर झाल्यानंतरच सावंत मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली जाणार आहे. या अनुषंगाने राजकीय हालचालींना गती आली आहे. सावंत मंत्रिमंडळात सध्या माविन गुदिन्हो, नीलेश काब्राल व बाबू मोन्सेरात हे तीन ख्रिस्ती मंत्री आहेत. यापैकी माविन व बाबूश यांच्या आसनाला तूर्त तरी धोका नाही. काब्राल यांना दिल्लीत बोलावून घेतल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदावर गदा येणार हे स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने दक्षिण गोवा मतदारसंघात ख्रिस्ती बांधवांची मते मिळवण्यासाठी सासष्टी तालुक्यात ख्रिस्ती आमदाराला मंत्रिपद देण्याचे भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी निश्चित केले आहे. त्यानुसार नुवेचे काँग्रेसचे फुटीर आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे निश्चित झाल्याचीही माहिती मिळते.
गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये काँग्रेसचे आठ आमदार फुटले, तेव्हा ज्येष्ठ आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी दिले होते. परंतु वर्ष उलटले तरी सिक्वेरा यांना मंत्रिपद मिळालेले नाही. सावंत मंत्रिमंडळात सासष्टीचा एकही मंत्री नाही. या तालुक्यात ख्रिस्ती आमदाराला मंत्रिपद दिल्यास येत्या लोकसभा निवडणुकीत ख्रिस्ती मते मिळवण्यासाठी भाजपला त्याचा फायदा होईल, असे पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची भावना बनली आहे.
दरम्यान, काब्राल यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे की, मंत्रिमंडळातून आताच कोणाला वगळून पक्षाने निवडणुकीआधीच वातावरण बिघडवू नये, त्याऐवजी प्रत्येक आमदार, मंत्र्याला लोकसभेसाठी दोन्ही जागांवर भाजप उमेदवार निवडून आणण्यासाठी टार्गेट द्यावे. त्यासाठी हवी तर सक्त ताकीद द्यावी. सध्या ३३ आमदार सत्तेत आहेत. सर्वांनी प्रामाणिकपणे काम केल्यास लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकता येतील.
काब्राल म्हणाले की, भाजपने कधीच हिंदू, ख्रिस्ती असा भेदभाव केलेला नाही. त्यामुळे ख्रिस्ती आमदाराला मंत्री करण्यासाठी ख्रिस्ती मंत्र्याला वगळणे हे मला पटत नाही. एका प्रश्नावर काब्राल म्हणाले की, मंत्रिमंडळातून कोणाला काढावे किंवा कोणाचा समावेश करावा हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आहे.
माझे असे वैयक्तिक मत आहे की, कोणालाही मंत्रिमंडळातून वगळण्याआधी त्या मंत्र्याची कार्यक्षमता तपासावी. संबंधित मंत्री लोकांसाठी उपलब्ध असतो का? तो कार्यक्षम आहे का? योग्य रीतीने काम करतो का? या गोष्टी तपासण्याची गरज आहे. एसटी, ओबीसी, हिंदू, ख्रिस्ती हे निकष लावून कोणालाही वगळू नये.
केंद्रीय नेतृत्वाला अहवाल सादर
कोणत्याही परिस्थितीत यावेळी लोकसभेची दक्षिण गोव्याची जागा गमवायची नाही, असे पक्षाने ठरवले आहे. केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. अलीकडेच चंद्रशेखर यांनी गोव्यात भेट देऊन आमदार, मंत्र्यांची मते जाणून घेतली होती. त्यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला अहवालही सादर केला आहे.