फोंडा - महावीर अभयारण्य, बोंडला अभयारण्य,म्हादई ह्या नावाखाली धारबांदोडा तालुक्यातील काही जंगले अगोदरच राखीव झाली आहेत. त्यात परत व्याघ्र साठी जंगले राखीव झाल्यास तर इथला शेतकरी मेटाकुटीस येईल व त्याचे जगणे असह्य होईल. तेव्हा या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून सरकारने होऊ घातलेले व्याघ्र राखीव क्षेत्र प्रकल्प टाळावे , धारबांदोडयातील शेतकर्यांना मोकळीक द्यावी असे निवेदन साकोर्डा ग्रामपंचायतीचे सदस्य महादेव शेटकर यांनी सरकारला केली आहे. या संदर्भात एक लेखी निवेदन त्याने उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर यांना दिले आहे.
सदर निवेदनात ते असे म्हणतात की ह्या परिसरातील लोक हे मुख्यतः शेती व बागायतीवर अवलंबून आहेत. उत्पन्नाचे ते एकमेव स्तोत्र त्या लोकांकडे आहे. सदरचे क्षेत्र राखीव झाल्यास लोकांना आपल्या शेतात व बागायतीमध्ये मोकळेपणाने फिरण्यास मिळणार नाही. पावलो पावले सरकारच्या वनखात्याची परवानगी घ्यावे लागेल. ह्या अगोदरच महावीर अभयारण्य खाली मोले भागातील काही लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. परंतु त्यांचे अजून योग्य असे पुनर्वसन झालेले नाही. ग्रामीण भागातील खनिज व्यवसाय बंद झाल्यानंतर लोक पुन्हा एकदा कृषी क्षेत्राकडे वळले आहेत. आताच कुठे त्यांच्या मेहनतीला फळ येत आहे. अशातच सदरक्षेत्र राखीव झाल्यास लोकांनी वर आणलेल्या बागायतीवर पाणी सोडावे लागणार. परिणामी त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची पाळी येईल. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी इथे येऊन इथल्या लोकांचे संगनमत करावे. लोकांच्या भावना समजून घ्याव्यात व त्यासंबंधीचा रीतसर पत्र व्यवहार केंद्राकडे करावा अशी मागणी ही ते करत आहेत.