पणजी - भाजपप्रणीत आघाडी सरकारमधून अगोदर बाहेर पडा व मग नेतृत्वाच्या प्रश्नाविषयी काय ती भूमिका घ्या, सरकारमध्ये राहून बोलू नका, असा स्पष्ट सल्ला कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी मगो पक्षाला सोमवारी दिला. उगाच धमक्या व ब्लॅकमेलिंगचे राजकारण नको, असेही मंत्री गावडे म्हणाले.
पुढील महिन्याभरात जर मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्याकडे ताबा दिला नाही तर मगोपला एखादा स्वतंत्र निर्णय घ्यावा लागेल, असे मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर म्हणाले होते. मंत्री गावडे सोमवारी कला अकादमीत आले होते. त्यावेळी पत्रकारांनी तिथे मंत्री गावडे यांना मगोपच्या इशा:याबाबत विचारले असता, गावडे म्हणाले की सध्या लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत व विधानसभेच्याही दोन मतदारसंघात पोटनिवडणुका होणार आहेत. त्यावेळी स्वत:ची वाटाघाटींची शक्ती वाढवून घेण्यासाठी कुणी इशारे देऊ नयेत. सरकारमध्ये राहून कसले इशारे देता, सरकारचा पाठींबा अगोदर काढून घ्या आणि मग काय त्या भूमिका घ्या. मगोपकडून धमक्यांचे राजकारण केले जात आहे हे सर्वाना कळते.
प्रियोळमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी अपक्ष निवडून आलेले मंत्री गावडे म्हणाले, की सध्याची स्थिती सर्वाना ठाऊक आहे. अगोदर स्थिती हाताळण्याची कुवत असायला हवी. सरकारमध्ये राहून धमक्या देणो योग्य नव्हे. मगोपने ब्लॅकमेलिंगचे राजकारण करू नये. नेतृत्वाविषयी बोलतात पण सध्या विविध नेत्यांची तोंडे वेगवेगळ्य़ा दिशेने आहेत. एक महिन्याची मुदत संपल्यानंतर मगोप सरकारमधून बाहेर पडतो की काय ते कळेल. मग आपण त्याविषयी अधिक बोलेन.
दरम्यान, बुधवारी मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहे काय असे विचारताच मंत्री गावडे यांनी आपल्याला तरी अजून बैठकीचे निमंत्रण आलेले नाही असे सांगितले.